तहसीलदार ओमप्रकाश गौड यांच्या मार्गदर्शनाखाली रेती माफियांवर कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 16 जानेवारी 2026) -
राजुरा तालुक्यात अवैध रेती तस्करीचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा अंतर्गत मूर्ती गाव परिसरात काल रात्री ११ वाजताच्या सुमारास महसूल प्रशासनाने अचानक धाड टाकत रेती तस्करांवर मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे रात्रीच्या अंधारात सुरू असलेला रेतीचा काळा व्यवसाय उघडकीस आला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तहसीलदार ओमप्रकाश गौड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांनी ही धडक कारवाई केली. वर्धा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन करून ती साठवली व वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने तात्काळ हालचाली सुरू केल्या.
या कारवाईमागे जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. सुरज ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्ती परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन व डंपिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तहसीलदार राजुरा व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच जय भवानी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष रोहित बत्तशंकर यांना मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांच्यासोबत घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या.
घटनास्थळी पोहोचताच अवैध रेती उत्खनन, वाहतूक व साठवणूक सुरू असल्याचे रंगेहाथ आढळून आले. कारवाईदरम्यान एक जेसीबी वाहन क्रमांक MH-CD-6990, बिना नंबर प्लेटचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर तसेच अंदाजे आठ ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. मात्र, दोन हायवा वाहनांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित हायवा वाहनांचे क्रमांक MH-34-BZ-2784 आणि MH-34-BZ-2782 नोंदवून घेण्यात आले असून, या वाहन मालकांना नोटीस बजावून तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सुरज ठाकरे यांनी तहसीलदार राजुरा यांच्याकडे केली आहे.
या कारवाईमुळे राजुरा तालुक्यातील रेती माफियांना मोठा धक्का बसला असून, नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला अवैध रेती व्यवसाय इतकी वर्षे प्रशासनाच्या नजरेतून कसा सुटला, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महसूल व पोलीस विभागातील काही घटक आणि रेती माफिया यांच्यातील संगनमताबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. सुरज ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे अवैध रेती तस्करीचे वास्तव समोर आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता राजुरा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
#SandMining #IllegalSand #Rajura #Chandrapur #RevenueAction #SandMafia #NightRaid #LawAndOrder #Tehsildar #OmprakashGoud #SubhashSalve #SurajThackeray #JaiBhavaniKamgarSanghtna #Illegal sand smuggling #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.