आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०८ जानेवारी २०२६) -
तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. छाया तानबाजी बोरकर यांची निवड झाल्याने बौद्ध समाजात मोठा उत्साह संचारला आहे. ही महत्त्वपूर्ण परिषद नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुजातपूर येथे १८ जानेवारी २०२६ रोजी जेतवन बौद्धभूमी येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
या तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय बौद्ध महिला बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्षपद प्रा. छाया तानबाजी बोरकर यांच्याकडे सोपवण्यात आले असून, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. बौद्ध धर्मातील मानवतावादी मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावीत, समाजात समता, न्याय व बंधुता प्रस्थापित व्हावी तसेच मानवी मूल्यांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने बौद्ध धम्म परिषद सातत्याने कार्यरत आहे.
बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार, सामाजिक समता, बंधुता आणि मानवी मूल्ये रुजवण्यासाठी प्रा. छाया तानबाजी बोरकर यांनी दीर्घकाळ केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे बौद्ध महिला चळवळीला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.
प्रा. छाया तानबाजी बोरकर या सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संस्थापक आहेत. त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण, शिक्षण प्रसार आणि वैचारिक जागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य असून पळसफुले काव्यसंग्रह, अडला हरी गाढवाचे पाय धरी, माणसाने खाल्ल्या मिठाला जागावं, शेर शिजला ईस्तो इजला, हिरवाई मनात जपताना हा चारोळी संग्रह, रणरागिणी कादंबरी, शापित शृंखला काव्यसंग्रह, झाडीच्या झुरवा काव्यसंग्रह, जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे, हो, मी सावित्री बोलता हे नाटक अशी अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. तसेच जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे आणि विद्येचा थोर विधाता ही पुस्तके लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
या निवडीबद्दल जेतवन संस्थेच्या संस्थापक, साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीताई शेवाळकर तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे प्रा. छाया तानबाजी बोरकर यांनी मनापासून आभार मानले आहेत. या परिषदेमुळे देशभरातील बौद्ध महिलांच्या चळवळीला नवी दिशा मिळणार असून, बौद्ध धम्माच्या मानवतावादी विचारांचा प्रभाव अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
#BuddhistWomen #BuddhaDhamma #WomenLeadership #SocialEquality #JusticeAndFraternity #BuddhistConference #NandedNews #ChhayaBorkar #MaharashtraNews #IndianBuddhism #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.