ग्रामगीता ते संविधान, एकाच रथावर सर्वधर्मीय विचारांची मिरवणूक
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
ऊर्जानगर / चंद्रपूर (दि. ०४ जानेवारी २०२५) -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिन महोत्सवानिमित्त ऊर्जानगर परिसर भक्ती, समता आणि सर्वधर्मीय ऐक्याच्या घोषणांनी दुमदुमून गेला. श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने स्नेहबंध सभागृह येथून सर्वधर्म ग्रंथदिंडी व भव्य रामधून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीने ऊर्जानगर वसाहतीतील मुख्य मार्गावरून जात सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक जागृतीचा जागर केला.
ग्रंथदिंडीत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, विद्यामंदिर हायस्कूलचे लेझीम पथक तसेच ऊर्जानगर वसाहतीतील महिला व पुरुष गुरुदेवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध धर्मग्रंथांचा समावेश असलेल्या या ग्रंथदिंडीत मराठी, हिंदी व इंग्रजी ग्रामगीता, भारताचे संविधान, भगवद्गीता, बुद्ध आणि त्याचा धम्म, गुरुग्रंथसाहेब, मोक्षमार्गप्रकाश, कर्मयोगी, गद्य ग्रामगीता यांसह अनेक ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण दिंडीत सर्वधर्म समभावाचे प्रभावी दर्शन घडले.
ग्रंथदिंडीसाठी सजविण्यात आलेला रथ वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुंदर तैलचित्रांनी नटलेला होता. कामगार मनोरंजन केंद्र येथून सुरू झालेली ग्रंथदिंडी सौदामिनी चौक, गुरुदेव सेवा मंडळ, विद्यानिकेतन चौक, दवाखाना, स्नेहबंध चौक, पोस्ट ऑफिस मार्गे नवीन मार्केट होत पुन्हा कामगार मनोरंजन केंद्र सभागृहात परतली.
दिंडीच्या मार्गावर असलेल्या इमारतीजवळील परिसर रहिवाशांनी तसेच विविध चौकांमधील सामाजिक संस्थांनी स्वच्छता करून परिसर सुशोभित केला होता. सर्वधर्मीय संतांचे फोटो लावून भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकारिणीच्या वतीने संतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी सेना संघटनेतर्फे तसेच सर्वधर्म मित्र परिवार ऊर्जानगरच्या वतीने ग्रंथदिंडीचे स्वागत करून सहभागी भाविकांना नाश्त्याचे वितरण करण्यात आले. वसाहतीतील विविध ठिकाणी पेय, दूध व चॉकलेटचे वितरण करण्यात आले. संतांच्या तैलचित्रांना हार अर्पण करून जयघोष करण्यात येत वातावरण भक्तिमय झाले. विद्यामंदिर शाळेच्या मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझीम पथकात सहभाग घेतला होता. यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. ग्रंथदिंडीत सहभागी महिला व पुरुषांनी सुमधुर आवाजात राष्ट्रसंतांची भजने म्हणत परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला.
या ग्रंथदिंडी व रामधून कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष मोरेश्वर मडावी चंद्रपूर आणि भाऊराव बावणे तुकुम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ग्रंथदिंडीत सहभागी विद्यामंदिर शाळा, शिक्षक व शिक्षिकांचा ग्रामगीता, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या ग्रंथदिंडीला गुरुदेव सेवा मंडळ तुकुम, खैरगाव, राष्ट्रवादीनगर येथील विविध मंडळांचे कार्यकर्ते तसेच ऊर्जानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेरीस सामूहिक प्रणाम घेऊन सर्वधर्म ग्रंथदिंडीची सांगता करण्यात आली.
#Urjanagar #ChandrapurNews #GranthDindi #SantTukdojiMaharaj #GadgeBaba #SarvaDharmaSambhav #RamDhuni #SocialHarmony #SpiritualProcession #MaharashtraNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.