आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 03 जानेवारी 2026) -
संघर्ष युवा विकास मंडळाच्या 25 वर्षपूर्तीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी, उपचार व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी साखरी येथे संपन्न झालेल्या या शिबिरातून मंडळाची सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि मानवी संवेदनशीलता ठळकपणे अधोरेखित झाली.
वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या सौजन्याने आयोजित या आरोग्य शिबिरात उपक्षेत्रीय प्रबंधक पोनी-2 व्ही. श्रीनिवास, खान प्रबंधक उदयसिंग ब्राह्मणे, क्षेत्रीय मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. रावली रेड्डी, सौ. जीएम, डॉ. अनुपा जया, सरपंच प्रणाली मडावी साखरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोहितकर, सचिव ॲड. इंजि. प्रशांत घरोटे संघर्ष युवा विकास मंडळ, कोषाध्यक्ष सुदर्शन बोबडे तसेच वेकोलीचे अधिकारी, कर्मचारी, मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराचा साखरी व परिसरातील तब्बल 294 महिला, पुरुष, युवक, युवती व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आजार निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मोफत औषध वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना दंत आरोग्य किट तर महिलांना विशेष आरोग्य किटचे वितरण करून त्यांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी घेण्यात आली.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत CPR देण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. अचानक उद्भवणाऱ्या संकटाच्या क्षणी जीव वाचविण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तपासणीत काही नागरिकांमध्ये विशेष आजार आढळून आल्यास त्यांच्यावर वेकोलीच्या सौजन्याने पुढील उपचार करण्यात येणार असल्याची ग्वाही संघर्ष युवा विकास मंडळाने दिली. त्यामुळे गरजू रुग्णांच्या मनातील उपचारांची चिंता दूर झाली आहे.
संघर्ष युवा विकास मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांच्या शिफारसीनुसार वेकोली CSR निधी अंतर्गत मंजूर झालेल्या तलाव खोलीकरण कामाची सुरुवात लवकरच करण्यात येईल, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सुतोवाच उपक्षेत्रीय प्रबंधक व्ही. श्रीनिवास यांनी केले. क्रिकेट मैदान, स्मशानभूमी व इतर ठिकाणी माती टाकून दिल्याबद्दल मंडळाचे सचिव प्रशांत घरोटे यांनी उपक्षेत्रीय प्रबंधकांचे विशेष आभार मानले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष युवा विकास मंडळाचे सर्व सदस्य, विशेषतः सुदर्शन बोबडे, अमोल डेरकर, सूरज गोरे, अमित निमकर, संतोष उरकुडे, अंकुश अडबाले, छोटू वांद्रे, संजय साळवे तसेच वेकोली बल्लारपूर क्षेत्रीय चिकित्सालयाची संपूर्ण टीम यांनी अथक परिश्रम घेतले. या आरोग्य शिबिरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान, विश्वास व कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे.
#HealthCamp #CommunityService #YouthDevelopment #CSRInitiative #HealthcareForAll #SocialResponsibility #RuralHealth #WCLSupport #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.