आमचा विदर्भ - राजुरा (दि. ३० नोव्हेंबर २०२५) -
राजुरा नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राजुरा व्यापारी असोसिएशनशी स्वतंत्ररित्या चर्चा सत्रांचे आयोजन केले. या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि उपस्थित व्यापारांनी शहरातील बाजारपेठेतील प्रमुख प्रश्न, व्यापाऱ्यांच्या अडचणी, सुरक्षेचे प्रश्न तसेच अनधिकृत व्यावसायिक स्पर्धा यासह विविध समस्या सविस्तरपणे मांडल्या. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांनी व्यापारी वर्गाच्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
महत्त्वाचे म्हणजे, राजुरा व्यापारी असोसिएशनने येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला अधिकृत किंवा एकेरी पाठिंबा दिलेला नाही. तरीदेखील अलीकडेच सोशल मीडियावर व्यापारी असोसिएशनचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करणारे मेसेज व्हायरल करण्यात आले. या मेसेजमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेषतः व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुद्धा या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने या दिशाभूल करणाऱ्या मेसेजने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
व्यापारी असोसिएशनने या मेसेजवर कठोर आक्षेप घेताच संबंधितांनी मेसेज सोशल मीडियावरून हटवले. याप्रकरणी व्यापारी असोसिएशनने स्पष्ट इशारा देत सांगितले की, संघटनेचा अधिकृत निर्णय किंवा भूमिका फक्त अध्यक्ष व कार्यकारिणीकडूनच जाहीर केली जाते. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावरील अनधिकृत व्यक्तीकडून येणारे कोणतेही संदेश सत्य मानू नयेत. व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, सत्यता पडताळूनच कोणतीही माहिती स्वीकारावी, असे आवाहन राजुरा व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
#RajuraElection2025 #TradersAssociation #NoOfficialSupport #FactCheckFirst #StopFakeMessages #PoliticalUpdates #RajuraNews #LocalElections #TradersVoice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.