२२ डिसेंबरला लोकार्पण, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभे राहिले २८० कोटींचे आधुनिक रुग्णालय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (०३ नोव्हेंबर २०२५) -
राज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत राहिलेले आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या २८० कोटी रुपयांच्या खर्चाच्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण २२ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत (RSS chief Mohan Bhagwat) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
विकासाच्या वाटचालीत ‘आरोग्यसेवा’चा नवा आयाम
अर्थमंत्री पदावर असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक भरीव निर्णय घेतले. “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या ध्येयवाक्यांच्या प्रेरणेने त्यांनी जिल्ह्यातील मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षणक्षेत्रात मोलाचे कार्य केले. त्याच ध्येयातून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेले हे २८० कोटी रुपयांचे अत्याधुनिक चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल आता पूर्णत्वास आले असून, पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी नवजीवनाचा आधार ठरणार आहे.
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
- या रुग्णालयात तळमजला व चार मजले असून अंदाजे एक लाख चौ.फुट क्षेत्रफळ आहे.
- १४० बेड क्षमतेचे हे केंद्र कॅन्सर निदान व उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे.
- त्यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, १६ स्लाइस सीटी आणि स्पेक्ट, दोन रेषीय प्रवेगक (Linear Accelerators), ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे यांसह आधुनिक प्रयोगशाळा (सूक्ष्मजीवशास्त्र, रक्तविज्ञान, हिस्टोपॅथोलॉजी) उपलब्ध आहेत.
- केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आदी उपचार विभाग स्वतंत्रपणे कार्यरत राहतील.
ऐतिहासिक निर्णय आणि प्रकल्पाचा प्रवास
२०१४ मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला. १७ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. त्यानंतर २६ जून २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. जिल्हा खनिज विकास निधी, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली.
मोहनजी भागवत यांचा लोकार्पणासाठी स्वीकार
या रुग्णालयाच्या उभारणीदरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष स्व. रतनजी टाटा यांच्याशी चर्चा करताना सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आमदार मुनगंटीवार यांनी मोहनजी भागवत यांना विनंती केली आणि त्यांनी २२ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली.
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
पालकमंत्री पदाच्या काळात आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेचा पाया मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले.
- १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवी इमारतींची मंजुरी
- बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालये
- मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
- उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे
- विविध आरोग्य संकुले पूर्णत्वास
या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून आज कॅन्सर हॉस्पिटलच्या रूपात चंद्रपूर जिल्ह्याला एक भव्य आरोग्यसेवा केंद्र प्राप्त झाले आहे, जे रुग्णसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
#ChandrapurCancerHospital #SudhirMungantiwarVision #SudhirMungantiwar #MohandJiBhagwat #DevendraFadnavis #TataTrust #HealthcareRevolution #VidarbhaDevelopment #NewHopeForPatients #CancerCareChandrapur #PublicWelfareProject #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.