बैठकीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. शेती ही केवळ व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे साधन आहे, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कृषी पंप विज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष बंडू गौरकार, महामंत्री भालचंद्र वडस्कर, महावितरण तज्ञ माधव जीवतोडे, युवा किसान मोर्चा अध्यक्ष पलींद्र सातपुते, अनिल मोरे, प्रभाकर ताजणे, विजय गुरनुले, रवींद्र चहारे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढविणे हे आपले ध्येय आहे. कृषी पंप, धान बोनस, कर्जमुक्ती, कृषी यांत्रिकीकरण, प्रशिक्षण केंद्रे, कृषी महाविद्यालय व कृषी हाट यांसारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. शेती ही मजबुरी नव्हे तर आर्थिक मजबुती देणारा व्यवसाय व्हावा यासाठी प्राधान्याने कार्य केले जात आहे.”
त्यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने चर्चिले जात आहेत. विधानसभेत सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बाजू मांडली आहे. “कृषी पंप हा चंद्रपूरकरांचा हक्क आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी माझा लढा कायम राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली ज्याद्वारे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, धान चुकतेही केले गेले. मुल येथे कृषी महाविद्यालय, अजयपूर येथे प्रशिक्षण केंद्र, तसेच ८० कोटी रुपयांचा कृषी हाट चंद्रपूरमध्ये उभारण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास इतका आदर्श व्हावा की पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात “खेती करने का तरीका हो तो बल्लारपूर विधानसभा क्षेत्र जैसा हो” असे म्हणावेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वतःच्या हक्कासाठी सजग राहणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
#FarmersFirst #ChandrapurUpdates #AgricultureGrowth #SudhirMungantiwar #FarmersRights #VidarbhaFarmers #FarmersWelfare #mankibaat #PrimeMinister #NarendraModi #ChhatrapatiShivajiMaharajAgriculturalHonorScheme #AgriculturalPumps #Paddybonus #loanwaiver #agriculturalmechanization #trainingcenters #agriculturalcolleges #agriculturalmarkets #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.