शेवटी राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १० मे २०२५) -
दारूच्या बाटलीवर प्रति बॉटल २० रुपये अधिक घेत असल्याची तक्रार, दारू दुकानातून अवैध दारू विक्री, बियर शॉपीमध्येच दारू पिण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था नाही, अशा अनेक तक्रारींना मागील अनेक दिवसांपासून डोळेझाक करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग खळबळून जागा होत विभागाने अखेर कारवाई केली आहे. (दि. ९) पहाटे राज्य उत्पादन शुल्क उपविभाग राजुरा गस्त करीत असताना, गुप्तहेरांच्या माहितीनुसार, गडचांदूर ते कोरपना रस्त्यावर उड्डाण पुलाखाली टाटा कंपनीची व्हिस्टा चारचाकी वाहन क्रमांक एम एच ३४ एए १७६५ अवैध देशी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक अभिनंदन कांबळे, दुय्यम निरीक्षक चंद्रकांत दरोटे, कुनाल कन्नाके, वैशाली सातपुते यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून वाहनास थांबवले.
या कारवाईत आरोपी अमर मधुकर वेट्टी वय ३३, प्रशांत नारायण मेश्राम वय २४ दोघेही रा. वनसडी ता. कोरपना यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २,९०० सीलबंद बाटल्या, एकूण किंमत एक लाख पाचशे रुपये, टाटा कंपनीची व्हिस्टा चारचाकी वाहन किंमत अंदाजे ८५ हजार असा एकूण १,८६,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए.ई) आणि ८३ नुसार अटक करण्यात आली आहे. कारवाई विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे चासकर, चंद्रपूर जिल्हा अधीक्षक नितीन धार्मीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. राज्य उत्पादन शुल्क विभाग राजुराचे निरीक्षक अभिनंदन कांबळे यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक चंद्रकांत दरोटे, कुनाल कन्नाके, वैशाली सातपुते यांच्या पथकाने सदर कारवाई केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक चंद्रकांत दरोटे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.