पीएम ई-बससेवेंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भूमिपूजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १४ ऑकटोबर २०२४) -
जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. त्यासाठीच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शासनाने चंद्रपूरला 50 ई-बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पर्यावरणपुरक ई-बस दळणवळणासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उत्तम साधन बनेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र पुरस्कृत पी.एम. ई -बस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भुमिपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपयुक्त मंगेश खवले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, सुभाष कोसनगोट्टूवार, रामपाल सिंग, नामदेव डाहुले, रवींद्र बेलावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘चंद्रपूरमध्ये एखाद्या प्रकल्पाचे भुमिपूजन किंवा उद्घाटन होते तेव्हा मनस्वी आनंद होतो. चंद्रपूरचे नाव देशात अग्रेसर असले पाहिजे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. या गावात एखादी योजना मंजूर झाली की, त्याचा लाभ या गावातील, शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना होतो,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा उल्लेखही केला. ‘चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन अकादमीला थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. सोबतच बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था, कॅन्सर केअर हॉस्पिटल, सैनिक स्कूल, एसएनडीटी विद्यापीठ आदी बाबी येथे उत्तमरित्या साकारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची आपली जबाबदारी वाढली आहे. केंद्र सरकारने चंद्रपूर शहरात शहरात 50 ई-बसला परवानगी दिली आहे. बस डेपो, ई- चार्जिंग व्यवस्था येथे निर्माण करण्यात येत आहे,’ अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
बस डेपोच्या परिसरात बचत गट आणि शेतक-यांच्या उत्पादीत मालासाठी सुसज्ज बाजारहाट, प्रशिक्षण व्यवस्था, संकुल व्यवस्था, फूड कोर्ट आदी बांधण्यात येणार आहे. भविष्यात हा परिसर शहराचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार असून बसस्टेशन आणि बाजार यादरम्यान रस्ता करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून बचत गट आणि शेतकऱ्यांनी आणलेला माल बस स्थानकातून बाजारातमध्ये येईल व पुढे ग्राहकसुद्धा येथून माल खरेदी करून शहरबस सेवेचा वापर करून आपापल्या गावी जातील, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #sudhirmungantiwar #ebus #ElectricBusDepotBhoomipujan #TadobaTigerReserve #WildlifeandEnvironmentConservation #Responsibility #ChandrapurCityMunicipalCorporation
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.