तातडीने लक्ष घालण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आश्वासन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १७ जुलै २०२३) -
विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी, पदवी निकाल लागले असून विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी लगबग करीत आहेत. याशिवाय विविध नौकर भरतीसाठी स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तहसील व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयातून गोळा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र या संधीचा फायदा घेऊन राजुरा तालुक्यातील काही सेतू केंद्र संचालक शासकीय नियमांच्या पलिकडे जाऊन मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. शासकीय अधिकारीही याबाबत अनभिज्ञच असल्याचे दर्शवित असल्याने 13 जुलै ला राजुरा पत्रकार संघाचे सचिव अनिल बाळसराफ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.उमाकांत धोटे, प्रविण देशकर, मनोज आत्राम, उमेश मारशेट्टीवार यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांची भेट घेऊन त्यांना समस्यांविषयी अवगत केले. याविषयी सर्व सबंधित अधिकारी व कर्मचार्यांना सूचित करून एकूण प्रकरणाचा रोज आढावा तसेच सेतू संचालक यांची बैठक घेऊन त्यांना योग्य सूचना देणार असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले. यामुळे राजुरा, कोरपना व जीवती तालुक्यात विद्यार्थी आणि शेतकरी यांना प्रमाणपत्रे काढण्यासाठी यापुढे त्रास होणार नाही, असा विश्वास पत्रकार संघाने व्यक्त केला आहे.
गेल्या एक महिन्यापासून राजुरा येथे उपविभागीय अधिकारी आणि (Tehsil Office) तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्रे करण्यासाठी खूप विलंब होत होता. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी पत्रकार संघ कार्यालयात लेखी तक्रारी दिल्या. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे दोन्ही अधिकारी नव्याने रुजू झाल्याने प्रथम थोडा उशीर होत होता. मात्र त्यानंतरही सेतू केंद्रातून अनेक दाखले ऑनलाईनरित्या तहसील कार्यालयात आल्यावर येथेही अक्षम्य दिरंगाई होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रवेशाच्या किंवा अर्ज भरायच्या मुदत संपण्याच्या स्थितीत विद्यार्थी आटापिटा करून विविध प्रमाणपत्रे मिळविण्याचा प्रयत्न करीत असतांना आणि खेड्यापाड्यातून सकाळपासून येऊन येथे ठाण मांडून बसत असतांना येथील एक नायब तहसीलदार चक्क तीन तास मोबाईलवर गेम खेळत असल्याचा लेखी आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे. हे तहसीलदार हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांने केला आहे. दुसर्या सास्ती येथील विद्यार्थ्यांच्या पालकाने आपल्या तक्रारीत सेतू केंद्र चालक अवाढव्य रक्कम मागत असल्याचा आरोप केला आहे. सेतू केंद्रातून ऑनलाइन आलेली कागदपत्रे पुढे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यास टाळाटाळ करीत आहेत. चनाखा येथील एका विद्यार्थिनी आठ दिवसापासुन नॉन क्रिमिलेयर साठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र दिनांक 12 जुलै पर्यंत तिचे काम झाले नव्हते. आई-वडीलांना शेतीच्या कामात मदत करण्याचे सोडून एका प्रमाणपत्रासाठी भटकंती करीत असल्याचे तिने सांगितले. उपविभागीय कार्यालयातील याच कामाची जबाबदारी असलेले नायब तहसीलदार दुपारी 12 ते 3 वाजतापासून आपल्या खुर्चीवर नव्हते. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींची नोंद घेऊन तातडीने सेतू केंद्रावरील विद्यार्थी व नागरिकांच्या आर्थिक लुटीला आळा घालावा आणि अधिकाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनाला मुरड घालावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (Rajura) (aamcha vidarbha)
राजुरा उपविभागीय कार्यालयात व तहसील कार्यालयात यापुढे विद्यार्थ्यांंना काही त्रुटी नसल्यास सर्व प्रमाणपत्रे तातडीने देण्यात येतील. नवीन रुजू झालेले तहसीलदार सुट्टीवर गेल्याने थोडा खोळंबा झाला, मात्र आता प्रमाणपत्राच्या बाबतीत त्वरेने काम करण्याच्या सूचना सर्व सबंधित अधिकारी व कर्मचार्यांना देत आहे. राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील सेतू सुविधा संचालकांची मीटिंग घेऊन त्यांना नियमानुसार शुल्क आकारण्याच्या सूचना देत आहे, अन्यथा त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. अर्जनवीस व भूमी रेकॉर्ड कार्यालयाला योग्य त्या सूचना देत आहे. यापुढे माझ्या क्षेत्रात विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांची कामे सूचारुपणे होईल.रविंद्र मानेउपविभागीय अधिकारी, राजुरासरकार प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे, यासाठी विविध योजना आखून शिक्षण प्रसारासाठी प्रयत्न करीत असतांना राजुरा येथे मात्र सेतू चालक आणि शासकीय अधिकारी विद्यार्थ्यांंना उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व, केंद्रीय जात यासारख्या अनेक प्रमाणपत्रासाठी विलंब करून त्रास देत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. यापुढे अशी तक्रार आल्यास वरीष्ठ स्तरावर हे प्रकरण नेऊन दाद मागण्यात येईल आणि सबंधिता विरुद्ध कारवाईचा आग्रह धरू. कुठल्याही बाबतीत कुणावरही अन्याय होत असेल तर राजुरा पत्रकार संघाचे कार्यालयात संपर्क साधावा.अनिल बाळसराफसचिव, राजुरा तालुका पत्रकार संघ
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.