Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: थकीत घरभाड्याच्या वादातून चंद्रपुरात हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाडेकरूने घरमालकीणचा हाताने आवळला गळा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. १७ मे २०२३) -         घरभाड्याच्या थकीत रकमेवरुन झालेल्य...
भाडेकरूने घरमालकीणचा हाताने आवळला गळा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १७ मे २०२३) -
        घरभाड्याच्या थकीत रकमेवरुन झालेल्या वादातून भाडेकरूने चक्क घरमालकीणची हाताने गळा दाबून हत्या केली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील चोर खिडकी परिसरात मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली आहे. अनुप सदानंद कोहपरे (२५, रा. वडकुली ता. गोंडपिपरी) असे अटकेतील भाडेकरूचे नाव आहे तर शर्मिला शंकरराव सकदेव (७०) असे मृताचे नाव आहे. (The tenant strangled the landlady with his hand) (Chandrapur)

        अनुप कोहपरे हा मागील काही वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे रोजगाराच्या शोधात आला होता. त्याला एका हॉटेलमध्ये कामही मिळाले. त्यानंतर तो चोरखिडकी येथील शर्मिला सकदेव यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याच्याकडे मागील काही महिन्यांचे घरभाडे थकीत होते. त्यामुळे शर्मिला यांनी त्याला घरभाड्यासाठी हटकले. तो रूम सोडून निघून गेला होता. पुन्हा काही दिवसांनी परत आला. त्यानंतर तो पुन्हा तिथेच राहू लागला. महिनाभरापूर्वी शर्मिलाच्या पतीचे निधन झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या.

        आर्थिक चणचण भासल्याने त्यांनी अनुपकडे थकीत भाडे वसुलीसाठी तगादा लावला. याचा त्याला प्रचंड राग आला. त्यातूनच तिला संपवण्याचा विचार करत होता, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. मंगळवारी पुन्हा भाड्याच्या पैशांवरून दोघांत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दोघांत धक्काबुकी झाली. त्यात शर्मिला खाली पडली. रक्तस्त्राव झाल्याने त्या जखमी झाल्या. मात्र, अनुपचा राग शांत झाला नव्हता. त्याने शर्मिला खाली पडली असताना तिचा गळा हाताने दाबून तिचा खून केला. घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. रामनगर पोलिस स्टेशनच पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गोंडपिपरीतील वडकुली गावात जाऊन अनुप कोहपरेला अटक केली आहे.

सीसीटीव्ही डीव्हीआर पळविला
        सकदेव यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. आपण केलेल्या हत्येचे चित्रण सीसीटीव्हीत झाले असल्याचा संशय अनुपला आला. त्यामुळे तो चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन पसार झाल्याचे पोलिस सूत्राने सांगितले. पोलिसांना अनुपवर संशय येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला त्याचे गाव गाठून अटक केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top