Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरोना काळात बंद पडलेल्या झाडीपट्टी रंगभुमीतील नाटकांना दिवाळीपासुन झाली सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्था निक नाट्यमंडळाचा संविधान व मिठाई देत केला सत्कार माजी जिप सदस्य संजय गजपुरे यांनी केले उपक्रमाचे कौतुक आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी...
स्थानिक नाट्यमंडळाचा संविधान व मिठाई देत केला सत्कार
माजी जिप सदस्य संजय गजपुरे यांनी केले उपक्रमाचे कौतुक
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
नागभीड -
        कोरोना काळात बंद असलेल्या झाडीपट्टी रंगभुमीतील नाटकांना दिवाळीपासुन सुरुवात झाली आहे. यामुळे नाट्यरसिकांना आता आवडत्या नाटक व संगीताची मेजवानी पुनःश्च मिळणार आहे. दरवर्षी आपल्या गावात नाटक करण्यासाठी गावातील तरुण व प्रतिष्ठित मंडळी महिन्याभरापासुनच याची पुर्वतयारी करतात. मंडपाची जागा निश्चिती, स्टेज निर्मिती, उद्घाटनासाठी पाहुण्यांची वेळ घेणे, नाट्यमंडळाची निवड करीत बहारदार नाटक ठरविणे व त्याची जाहिरात करणे, तिकिटविक्री, या व अशा अनेक बाबींची तयारी स्थानिक नाट्यमंडळाला स्वत:चा वेळ देत करावी लागते. 

        नाटक पुर्ण होईपर्यंत या नाटकासाठी धडपड करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. वेळप्रसंगी वेगवेगळ्या अप्रिय घटनांनाही त्यांनाच सामोरे जावे लागते. मात्र नाटक यशस्वी व्हावे यासाठी मेहनत करणाऱ्या या कार्यकर्त्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष असते. या सर्वांची जाणीव ठेवत झाडीपट्टी रंगभुमीवरील नागभीड-वडसा निर्मित प्रसिद्ध शिवम् थिएटर्स चे लेखक-दिग्दर्शक युवराज गोंगले यांनी यावर्षीपासुन ज्या ठिकाणी त्यांच्या नाट्य कंपनीचे नाटक होईल तेथील नाट्य मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचा नाट्य प्रयोगाच्या सुरुवातीला सत्कार करण्याचा मनोदय जाहीर केला व त्याची सुरुवात नागभीड तालुक्यातील कोर्धा येथुन केली. 
        भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी कोर्धा येथे मंडईनिमित्य नाट्यप्रयोगाचे आयोजन केल्या जाते. यावर्षी शिवम् थिएटर्स चे गाजत असलेले नाटक “विरा तु परतून ये रे" या नाटकाचे आयोजन जय जवान जय किसान नाट्य कला मंडळ, कोर्धा यांनी केले होते. या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी असलेले समारंभाचे अध्यक्ष या क्षेत्राचे माजी जि.प.सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे तसेच उद्घाटक माजी पं.स. सदस्य व तालुका भाजप अध्यक्ष संतोष रडके यांच्या प्रमुख उपस्थितीत दिग्दर्शक युवराज गोंगले व नाट्य निर्माती सौ.ममता गोंगले यांनी हा सत्काराचा उपक्रम सुरु करण्या पाठीमागची भुमिका विशद केली व नाट्य मंडळाचे अध्यक्ष सचिन वाकुडकर, सचिव गोवर्धन हिवरकर, व्यवस्थापक विजय खोब्रागडे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छांसह भारतीय संविधानाची प्रत व मिठाई देत सत्कार केला. 

        संजय गजपुरे यांनी दिग्दर्शक युवराज गोंगले यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभुमी समृध्द व संवेदनशील होत असल्याचे प्रतिपादन करीत युवकांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त केली व यापासून दुर होत आपला वेळ व पैसा सत्कार्यी लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मंचावर कोर्धा ग्रा.पं.च्या सरपंच सौ.पुष्पाताई चौधरी, उपसरपंच दिनेश चौधरी, कृऊबास संचालक धनराज ढोक व मनोहर चौधरी, भाजपा जि.प.प्रमुख अरविंद भुते, तंटा मुक्त समिती अध्यक्ष हरिदास नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते वासुदेवजी जिवतोडे, प्रा.हरिदास वाकुडकर, स्वप्निल नवघडे, पोलीस पाटील आनंद जिवतोडे तसेच ग्रा.पं.चे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नाट्य मंडळाचे उपाध्यक्ष शंकर मशाखेत्री यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top