वीज पडल्याने एक ठार, तीन विद्यार्थी जखमी
कोठारीत घरावर वीज पडली
मूल, सावलीत अनेकांच्या घरात पाणी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. अशातच आज सकाळपासूनच आकाशात मेघ दाटून होते. दरम्यान सकाळी 10 वाजतापासून जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूर शहरात देखील काल सकाळी 11 वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर ब्रम्हपुरी, गोंडपिपरी तालुक्यात तीन ते चार ठिकाणी वीज कोसळली. वीज पडल्याने जिल्ह्यात एक ठार तर तीन शाळकरी मुले किरकोळ जखमी झाले आहेत. मूल व सावली तालुक्यात शेकडो घरांची पडझड झाली असून शेतशिवारात पाणी भरल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर शहरातील सखल भागांमध्ये देखील पाणी जमा होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकूणच या मुसळधार पावसामुळे आज शनिवारी जिल्ह्यात विजेचा कहर बघायला मिळाला. चंद्रपूर शहरात आज सकाळी जवळपास 11 वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वर्ग, व्यापारी, विद्यार्थी यांची चांगलीच ससेहोलपट झाली. अनेकांना दुकानांच्या आडोशाला, चहा टपरी किंवा शेड खाली आसरा घ्यावा लागला. जवळपास एक ते दीड तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रहेमतनगर, रामनगर, तुकूम, लोकमान्य टिळक विद्यालय, जलनगर, तुकूम तलाव वॉर्ड, जयंत टॉकीज परिसर, वाहतूक नियंत्रण विभाग कार्यालय आदी सखल भागांमध्ये टोंगळाभर पाणी जमा झाले. यामुळे पाण्यातून वाहने काढताना दुचाकी चारचाकी वाहनधारकाना तारेवरची कसरत करावी लागली.
शाळेवर वीज कोसळून 3 विद्यार्थी जखमी
शनिवारी गोंडपिपरी तालुक्यात मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. विजेने तर कहरच केला. तालुक्यात दोन गावांत वीज कोसळली राळापेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर वीज कोसळल्याने तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच विठ्ठलवाडा शेत शिवारात चिंचेच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली ठेवलेले संपूर्ण शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकन्यांचे हजारोंचे नुकसान झाले.
कोठारीत घरावर वीज पडली
शनिवारी बल्लारपूर तालुक्यात पावसाने मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणात विजांचा प्रचंड कडकडाट झाला. कोठारी येथील विठ्ठल मारोती रागीट यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. सदर विठ्ठल रागीट यांचे घर दाट वस्तीमध्ये असल्याने घरालगत राहणारे सर्व लोक भयभीत झाले. कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले.
मूल, सावलीत अनेकांच्या घरात पाणी
पावसामुळे मूल व सावली तालुक्यातही किरकोळ घरांची पडझड होऊन अनेक भाग जलमय झाले. वॉर्ड क्रमांक येथील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. अनेक मोकळ्या भूखंडाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रमिकनगर वॉर्ड क्रमांक 8 येथे अजय गुरनुले यांच्या घरात पाणी जमा झाले. नागपूर रोड लगत भाग्यरेखा परिसरात श्रीकांत गिरडकर यांच्याही घरात पाणी शिरले. यानंतर तालुका प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करत आढावा घेतला. प्रशासन सतर्क असून याशिवाय नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सावली शहरात प्रभाग क्र. 2 मधील प्रेमदास गेडाम, कुताबाई बांबोडे, विनायक गेडाम यांच्या घरांची किरकोळ पडझड झाली. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व इतर शेती उपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.