Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तुमच्या दारातून उड्डाण करणार 'मनोरथ'! ड्रोन टॅक्सीसेवा सहा वर्षांत सुरू; केंद्राकडून पथदर्शी प्रकल्प सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तुमच्या दारातून उड्डाण करणार 'मनोरथ'! ड्रोन टॅक्सीसेवा सहा वर्षांत सुरू; केंद्राकडून पथदर्शी प्रकल्प सुरू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर...
  • तुमच्या दारातून उड्डाण करणार 'मनोरथ'!
  • ड्रोन टॅक्सीसेवा सहा वर्षांत सुरू; केंद्राकडून पथदर्शी प्रकल्प सुरू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई/नवी दिल्ली - 
वाहनांच्या गर्दीमुळे गुदमरलेले रस्ते आणि काही मिनिटांच्या प्रवासाला लागणारे तासन्तास हा अनुभव जवळपास प्रत्येकानेच घेतला असेल. वाहतूक कोंडीत अडकल्यावर, 'उडून इच्छित ठिकाणी जाता आले तर...' असा विचार कदाचित मनात आलाही असेल. आता हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने नामी उपाय शोधला आहे, तो म्हणजे ड्रोन टॅक्सी! ही सेवा येत्या ६ वर्षांतच तुमच्या दारापर्यंत येण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वच शहरांमध्ये रस्त्यांवरील वाहतूककोंडी आणि रेल्वेगाड्यांमधील वाढत्या गर्दीमुळे प्रवास म्हणजे मोठे दिव्यच झाले आहे. या 'यातायाती'च्या समस्येवर केंद्र सरकारने ड्रोन टॅक्सी सेवेची संकल्पना मांडली आहे. याबाबत नागरी उड्डाण विभागाचे संयुक्त सचिव अंबर दुबे यांनी सविस्तर माहिती दिली. दुबे म्हणतात, ड्रोन टॅक्सी २०३० पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या दारात उतरू आणि उड्डाण करू शकेल. त्यासाठी केंद्र सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे.
नागरिकांना जलदगती प्रवासाचा हा स्वप्नवत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पाबाबत काही कंपन्या तसेच विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. नवीन उद्योजक पुढे यावेत म्हणून कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर सवलती (पीएलआय - परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्हज) देण्याची दुसरी 'खिडकी' सरकारने उघडली असून, आतापर्यंत १४ कंपन्या पात्रही ठरल्या आहेत. या कंपन्यांना १५ ऑगस्टपर्यंत निधी वितरित केला जाईल. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारीत तिसरी 'खिडकी उघडून बाकीची रक्कम अदा केली जाईल, अशी माहिती अंबर दुबे यांनी दिली.
ड्रोन उड्डाणाबाबत नवीन शिथिल नियम तयार करण्यात आले आहेत. नूतन ड्रोन धोरणामुळे ड्रोन कंपन्यांच्या उत्पन्नात ५० ते ७० टक्के वाढही झाली आहे. त्याशिवाय देशांतर्गत उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ड्रोन आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील ड्रोन उद्योगाला मागणी आणि पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही दुबे यांनी दिली. बहुतेक सहा वर्षांत म्हणजे २०२८ पर्यंत सैन्यदलासाठी ड्रोन टॅक्सीचा वापर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गांवर ड्रोन
अॅम्ब्युलन्स! केंद्र सरकार देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर हेलिकॉप्टर रुग्णवाहिका अथवा ड्रोन अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करेल. त्यासाठी मीरत एक्स्प्रेस-वेवर पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे, अशी माहिती नागरी उड्डाण विभागाचे संयुक्त सचिव अंबर दबे यांनी दिली. त्याचा प्रतिसाद पाहून अन्य महामार्गावरही ड्रोन टॅक्सी सेवेला आरंभ केला जाईल. अपघातांच्या प्रकरणात जीवितहानी आणि वित्तहानी रोखण्यासाठी तसेच कमीत कमी वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी ड्रोन रुग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ड्रोन क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करणार : ज्योतिरादित्य शिंदे
देश २०३० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जगातील ड्रोन हबचे नेतृत्व करेल, असा विश्वास केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. या क्षेत्रात तीन टप्प्यांमध्ये देश मार्गक्रमण करणार असून त्यासाठी १२ मंत्रालयांच्या सेवा घेण्यात आल्या आहेत. दोन ते तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर युवकांची मासिक ३० हजार रुपयांच्या पगारावर ड्रोन वैमानिक म्हणून नियुक्ती केली जाईल. येत्या काळात १ लाख ड्रोन वैमानिकांची गरज भासेल. ही उत्तम संधी असल्याचे शिंदे म्हणाले.गतवर्षी शिंदे यांनी भारतीय ड्रोन उद्योग २०२६ पर्यंत १५ हजार कोटींच्या घरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top