- कोरपना महसूल विभागाची मोठी कारवाई
- पाटील कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 10 कोटी 80 लाख 14 हजार रुपयांचा ठोठावला दंड
- 1000 ब्रासची तात्पुरती परवानगी घेऊन कितीतरी पट अधिक अवैध उत्खनन केल्याप्रकरणी दंड
- चुनखडीचे दगडाने क्रशर वर गिट्टी तयार केली जात होती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकळेकर यांनी पुण्यातील पाटील ग्रुपची उपकंपनी असलेल्या पाटील कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीवर 10 कोटी 80 लाख 14 हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. तात्पुरत्या परवानगीपेक्षा कितीतरी पट अधिक अवैध उत्खनन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
पुण्यातील पाटील ग्रुपची उपकंपनी असलेल्या पाटील कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला पडोली ते वनसडी हायब्रीड अॅन्युइटी या NAG-143 रस्त्याच्या बांधकामासाठी 1000 ब्रास दगड आणि मुरुम उत्खननासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. कोरपना तहसीलच्या वनोजा येथील खाजगी क्षेत्रातील सर्व्हे क्र. 34/2 आणि 34/3 मधून दगड आणि मुरुम उत्खननासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली. मात्र कंपनीने याचा फायदा घेत खासगी क्षेत्रात बसवलेल्या क्रशरने चुनखडी दगडाची गिट्टी तयार केली जात होती. पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने
कोणत्याही परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात चुनखडीचे उत्खनन करून गिट्टी तयार करण्यास सुरुवात केली. चुनखडीचे दगड उत्खणासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाची परवानगी आवश्यक आहे.
खनिकर्म विभागाच्या चौकशी करण्याच्या आदेशानंतर तहसीलदारांनी वनोजा परिसरात चौकशी करून पाटील कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 10 कोटी 80 लाख 14 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रात्रभर फिरून कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या डोळ्याखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना स्थानीय महसूल अधिकारी प्रशासन काय करत होते हा मोठा यक्ष प्रश्न उभा झाला आहे. रोड बांधकामासाठी तात्पुरती 1000 ब्रासची परवानगी घेऊन चक्क क्रेशर वर गिट्टी तयार करण्याचे काम सुरू होते हे मात्र नवलच. नेहमी वरतून चौकशीचे आदेश आल्यानंतरच कारवाई का करण्यात येते हा प्रश्न जनतेला पडला आहे. कोरपना तालुक्यात या पूर्वी ही मोठ्या प्रमाणात वाळू, दगड मुरूम सारख्या गौण खनिज चोरीचे अनेक आरोप सारखे होत असते हे ही विशेष आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.