Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आकाशातून पडलेली ती रिंग आणि सिलेंडर चे गूढ कोडे उलगडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आकाशातून पडलेली ती रिंग आणि सिलेंडर चे गूढ कोडे उलगडले विदर्भ, मराठवाड्यात पडलेले ते आगीचे गोळे चीनच्या 'चँग झेंग ३ बी' रॉकेटचे अवशे...
  • आकाशातून पडलेली ती रिंग आणि सिलेंडर चे गूढ कोडे उलगडले
  • विदर्भ, मराठवाड्यात पडलेले ते आगीचे गोळे चीनच्या 'चँग झेंग ३ बी' रॉकेटचे अवशेष
  • भविष्यात वाढणार अशा घटना
  • वाचा सविस्तर...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
उत्तर महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंतच्या आकाशात दिसलेले अग्निलोळ हे चीनच्या 'चँग झेंग ३ बी' या रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाशात दिसलेल्या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत जमिनीवर सापडलेले अवशेष रॅकेटचा तिसरा टप्पा आणि चिनी रॉकेटच्या क्रायोजिनिक इंजिनाचे भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विविध कृत्रिम उपग्रह आणि रॉकेटचे अवशेष अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात कधी प्रवेश करतील याबाबत सोशल मीडियावर माहिती देणारे अभ्यासक जोसेफ रॅमिस यांनी शुक्रवारीच चिनी रॉकेटच्या वातावरणातील प्रवेशा बाबत अंदाज जाहीर केला होता. या अंदाजानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्री सात वाजून ३२ मिनिटांनी चिनी रॉकेटचा वातावरण प्रवेश अपेक्षित होता.
प्रत्यक्षात या अंदाजापेक्षा दहा मिनिटे उशिरा म्हणजे सात वाजून ४२ मिनिटांनी चिनी रॉकेटच्या अवशेषांनी आफ्रिकेच्यावर वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर वातावरणातून जमिनीच्या दिशेने येताना अवशेष भारतात सर्वप्रथम सुरत येथे पाहिले गेले. त्यानंतर वायव्येकडून आग्नेय दिशेने अवशेषांचा प्रवास सुरू असताना मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणांहून चिनी रॉकेटच्या जळत्या अवशेषांचे दर्शन घडले.
या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत नागरिकांना जमिनीवर धातूची वर्तुळाकार कडी आणि गोलाकार भाग सापडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्राच्या आकाशात दिसलेली घटना आणि जमिनीवर सापडलेले अवशेष हे चार फेब्रुवारी २०२१ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या चिनी रॉकेट 'चँग झेंग ३ बी' या लाँग मार्च श्रेणीतील रॉकेटचे असल्याचे स्पष्ट आहे. भूस्थिर उपग्रहांना अवकाशात सोडण्यासाठी या रॉकेटचा वापर केला जातो.'
'उपग्रह अवकाशात मुक्त केल्यानंतर तीन मीटर व्यास आणि १२ मीटर लांबी असलेला रॉकेटचा तिसरा टप्पा पृथ्वीभोवती काही काळ फिरत राहतो. कालांतराने त्या अवशेषांच्या कक्षेचा ऱ्हास होऊन ते वातावरणात प्रवेश करतात. चँग झेंग रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजिनिक इंजिनचा समावेश असतो. ज्यामध्ये द्रवरूप हायड्रोजन इंधन म्हणून; तर द्रवरूप ऑक्सिजन ऑक्सिडायझर म्हणून वापरण्यात येतो. या दोन्ही घटकांच्या टाक्यांपासून ते इंजिन आणि तिसऱ्या टप्प्याचे कवच असे सर्व भाग शनिवारी वातावरणातून जमिनीकडे येताना घर्षणामुळे जळत आले. जमिनीवर सापडलेल्या कडीचा व्यास, इंजिनाचे भाग चिनी रॉकेटचे असल्याचेच सिद्ध करतात,' असेही सूत्रांनी सांगितले.

भविष्यात अशा घटना वाढणार
पृथ्वीनजीकच्या कक्षेत फिरणारे रॉकेट आणि उपग्रहांचे सर्व निकामी आणि अनियंत्रित अवशेष वातावरणात प्रवेश करून घर्षणाने नष्ट होतात. त्यांचे काही भाग पूर्णपणे न जळता खाली आले तरी त्यांपैकी बहुतांश भाग समुद्रात कोसळतात. क्वचित प्रसंगी ते जमिनीवर आणि त्यातही मानवी वस्तीवर कोसळण्याची उदाहरणे सापडतात. मात्र, अवकाशातील कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणासोबत मानवी वस्तीवर हे अवशेष कोसळण्याची शक्यताही वाढत जाणार असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अशा अवशेषांमुळे कोणाचे नुकसान झाल्यास ज्या देशाच्या किंवा कंपनीच्या मालकीचे ते अवशेष आहेत, त्यांनी ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याची तरतूद आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top