- दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. ०३ येथील जागेच्या मोजनीला आता लवकर होणार सुरुवात
- जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत ने भूमी अभिलेख कार्यालयात भरले ६ लाख रुपये
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
तहसिल जिल्हा चंद्रपूर येथील दुर्गापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. ०३ येथील मानिव गावठाण म्हणून सण २०१९ ला महाराष्ट्र शासनाने संपादीत केलेल्या अतिक्रमीत जमिनीचा रेंगाळत असलेला अभिन्यास जिल्हा प्रशासनाने तयार करून द्यावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मेश्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर जागेच्या मोजणीला सुरुवात होण्याचा मार्ग आज मोकळा झाला.
सदर जागेचा मोजनीचा प्रश्न सूटावा याकरिता जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मेश्राम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व संपर्कमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत विस्तृत निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांनुसार
दिनांक २८ जून २०२१ व दिनांक ०६ जानेवारी २०२२ ला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० कलमी सभागृह येथे संबंधित सर्व अधिकार्यांची बैठक झाली होती व त्या बैठकीत ठरलेल्या निर्देशानुसार आज सदर जागेच्या मोजणीला लागणार्या खर्चापैकी अर्धा खर्च म्हणजेच ६ लक्ष रुपये ग्रामपंचायत दुर्गापुर तर्फे उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय चंद्रपूर येथे चालान द्वारे भरण्यात आला.
तहसील जिल्हा चंद्रपूर येथील मौजा दुर्गापुर वार्ड क्रमांक ०३ येथील सर्वे क्रमांक १६८ व १६९ (नवीन सर्वे क्रमांक ८६, ८७, ८८, ८९) २२.२५ ऐकर जमिनिवर मागिल ३० ते ३५ वर्षापासून सध्यास्थितीत जवळपास ९०० हून अधिक परिवार राहात असून सदर जमीन ही बेंडले कुटुंबीयांची होती.
सदर जमीन मानवी गावठाण विस्ताराकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने बेंडले कुटुंबीयांतर्फे नोव्हेंबर २०१९ मध्ये संपादित केली आहे. सदर जागेच्या मोबदल्यात राज्य शासनाने मूळ जमीन मालकाला पैसे दिले असून सध्या स्थितीत तलाठी रेकॉर्डवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची सुद्धा नोंद झालेली आहे. मात्र वरील उल्लेखित संदर्भाने शासन निर्णयानुसार मानीव भूसंपादनाची कारवाई जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडून करण्यात यावी तसेच सदर जमिनीवर नगर रचना विभाग, चंद्रपूर यांच्याकडून अभिन्यास तयार करून देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश होते तरीही मागील २ वर्षां पासून सदर विषय रेंगाळत होता व म्हणून यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली सतत २ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्या बैठकीत या मोजणी च्या संबंधातील सर्व अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीतील चर्चेनुसार सदर जागेच्या मोजणी करिता लागणारे शुल्क भरण्या संबंधाने ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले व तसेच सदर जागेच्या एकूण मोजणीचा खर्च संबंधीत विभागातर्फे अंदाजे १२ लक्ष रूपये एवढा काढण्यात आला होता.
सदर मोजणीचा खर्च हा त्या जागेवर वास्तव्यास असणाऱ्या घरमालका तर्फे घेण्यात यावा व सर्व नागरिकांतर्फे एकूण १२ लाख रुपये गोळा करून भूमी अभिलेख कार्यालय चंद्रपूर येथे भरल्यानंतरच मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले होते. परंतु वार्ड क्रमांक ३ येथे वास्तव्यास असलेल्या स्थानिक सर्वसामान्य कुटुंबातर्फे मोजणी करिता लागणारे शुल्क आकारू नये याकरिता जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी मागील सहा महिन्यात इतर विभागाकडून सदर जागेच्या मोजनीकरिता पैसे भरता येईल का याचे अवलोकन केले असता कोणत्याही विभागाने पैसे भरण्यास अनुकूलता दर्शविली नसल्याने हा प्रश्न पुन्हा मागील सहा महिन्यापासून रेंगाळत राहिला होता.
सदर बाब पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशनुसार जिल्हाधिकारी यांनी मोजणी संदर्भात असलेल्या नियमाला मोठया प्रमाणावर शिथिलता देण्यासंदर्भात उप अधीक्षक भूमि अभिलेख, चंद्रपूर यांना निर्देश दिले होते व सदर जमिनीच्या मोजणी करिता लागणाऱ्या शुल्काची फक्त ५० टक्के रक्कम घेऊन मोजणीची कार्यवाही सुरू करावी व "क" प्रत तयार करण्याची कार्यवाही करावी असे आदेश दिले असून या संदर्भात एक संयुक्त अधिकाऱ्यांचे पत्र काढण्यात आले होते. व त्याच अनुषंगाने आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ ला ग्रामपंचायत दुर्गापूरच्या माध्यमातून ही ५० टक्के रक्कम म्हणजेच जवळपास ६ लक्ष रुपये भरण्यात आले व यामुळे मागील २ ते अडीच वर्षांपासून रेंगाळत असलेला जमीन मोजणीचा विषय मात्र आता मार्गी लागला.
या विषयासंदर्भात वारंवार शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करून संबंधीत सर्व अधिकार्यांची बैठक लागावी. वार्ड क्रमांक ३ मधील राहिवासियांना मोजणीचे पैसे भरावे लागू नये व सदर प्रश्न तात्काळ पूर्णपणे मार्गी लागून या वार्डाचा विकास व्हावा याकरिता सतत पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, ग्रामपंचायत दुर्गापूर चे सदस्य व या जमिनी संदर्भात न्यायालयीन लढाई लढणारे राजेंद्र मेश्राम, ग्रामपंचायत दुर्गापूर सरपंच सौ. पुजा मानकर, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, माजी सरपंच अमोल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन मांदाडे, शिवसेना युवा नेते शार्दुल गणवीर यांचे वार्डवासीयांनी आभार मानले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.