- तुझ्या लिखाणाची शाई उजागर झाली पाहिजे
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : पोंभुर्णा पंचायत समितीत रंगले संविधानावर कवी संमेलन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पोंभुर्णा -
आय.एस.ओ.नामांकित पोंभुर्णा पंचायत समीतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव संविधानाच्या कवितांनी रंगला. नागरिकांत शासकिय योजना व अस्तित्वात असलेले कायदे याबाबतची जाण, प्रसार व प्रचार व्हावा यासाठी 'संविधान व आजची युवा पिढी' या विषयावर नुकतेच कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध युवा कवी, मुक्तपत्रकार अविनाश पोईनकर होते. उद्घाटन पं.स.सभापती अल्काताई आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिथी म्हणून उपसभापती ज्योतीताई बुरांडे, भामरागडचे सामाजिक कार्यकर्ते ॲड.लालसू नोगोटी, पं.स.सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, फिनिक्सचे अध्यक्ष नरेश बोरीकर उपस्थित होते. कवी भिमानंद मेश्राम यांच्या निवेदनात संविधानिक विचारांचा जागर पंचायत समीतीत कवितांतून झाला.
"सम्यक विचारांची लोकशाही आली पाहिजे
तुझ्या लिखाणाची शाई उजागर झाली पाहिजे"
गटविकास अधिकारी तथा कवी धनंजय साळवे यांनी 'बा भिमा' कवितेतून भारतीय संविधानातील लोकशाही अधोरेखित करत विचारप्रवृत्त रचना सादर केली. गोंडपिपरीचे कवी अरुण झगडकर, दुशांत निमकर यांनी संविधान एकदा वाचून घेण्याची आर्त हाक कवितेतून दिली. उर्जानगरचे कवी धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे यांनी खास शैलीत संविधानिक मुल्यांची जाण आणि भान ठेवण्याचे आवाहन केले.
"साफ होतील तुझ्या मनाला वेढलेली
असंख्य प्रश्नांची जळमटं
आणि होईल नायनाट तुझ्या मेंदूला ग्रासलेल्या
दांभिक, सनातनी विचारांचाही..."
बल्लारपूरच्या कवयित्री अर्जुमनबानो शेख यांनी संविधान हा ग्रंथ वाचल्याने अंधभक्त मेंदूत मानवतेचा विचार उजागर होईल, हा सूर छेडला. कवी विजय वाटेकर यांनी मुक्तछंद कवितेतून संविधानिक व्यवस्थेचे वास्तव मांडले. कवयिञी वैशाली दिक्षीत, सुचिता जिरकुंटवार, विजया पिंपळकर, संगिता बांबोळे, मनिषा मडावी, कवी योगिराज उमरे यांनी देशात समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याचा अर्थ भारतीय संविधानच असल्याची प्रांजळ भावना अभिव्यक्त केली.
"सर्व मानवा मार्ग दाखवी जगी कसे वागावे
नव्या पिढीने पुन्हा पुन्हा हे संविधान वाचावे"
आमडीचे कवी प्रशांत भंडारे यांनी कवितेतून नव्या पिढीला संविधान हाच जगण्याचा मार्गदाता असल्याची भुमीका आपल्या अप्रतिम कवितेतून विषद केली. कवी सुनिल बावणे, संतोष ऊईके, विनोद पोगुलवार, बी.सी.नगराळे यांनी संविधानामुळे देशाची एकता, अखंडता अबाधित असल्याची वंदना कवितेतून मांडली.
"त्यांनी घडवले आम्ही बिघडतोय
आम्ही भारताचे लोक हे काय करतोय ?"
कवयित्री शितल धर्मपुरिवार यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, मुठभर लोकांमुळे देश धोक्यात येवू नये, यासाठी संविधानाच्या उद्देशिकेची अंमलबजावणी गरजेची असल्याचा टाहो मांडला. कवी शुभम कन्नाके, लक्ष्मण खोब्रागडे, बालकवयित्री योगेश्वरी देऊरमल्ले, सतिश शिंगाडे, विशाल कोसरे, राकेश शेंडे, मसराम यांनीही बहारदार रचना सादर केल्या.
"विश्वात भारताची गाथा महान आहे
सर्वोपरी अम्हाला हेे संविधान आहे"
चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांनी संविधान प्रत्येक भारतीयांची गाथा असून ते जपण्याची बांधिलकी शब्दातून मांडली. रेवानंद मेश्राम यांनी आपल्या कवितेतून संविधानाची दिशा अधोरेखित केली.
"उच्च निच हे मानत नाही संविधान मित्रा
हक्क आणि कर्तव्याचे ते देई भान मित्रा"
कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या कवितेने कविसंमेलनात रंगत आणली. कविसंमेलनाचे अध्यक्ष कवी अविनाश पोईनकर यांनी कविता सादर करत संविधानिक मुल्यांचा प्रसार व प्रचार साहित्यिकांनी साहित्यातून कृतियुक्त करण्याची गरज असल्याचे मत मांडले. कवी सुधाकर कन्नाके यांनी बहारदार रचना सादर करत संमेलनाचे आभार मानले. पंचायत समीती पदाधिकारी व अधिकारींनी संमेलन आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.