- अँड. दीपक चटप
माझे कुटुंब शेतकरी चळवळीशी संबंधित असल्याने बालवयापासून अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी होत असतो. माझे काका वामनराव चटप हे तीनदा राजुरा विधानसभेतून निवडून आले. काकांनी व सुधीर भाऊंनी विधानसभेत विरोधी बाकावर एकत्रित काम केले असल्याने अनेकदा त्यांच्याकडून सुधीर भाऊंच्या कामाच्या शैलीतील अभ्यासुपणा, सातत्य व आक्रमकता याविषयी ऐकले. संसदीय आयुधांचा गाढा अभ्यास असणारे राज्याच्या विधिमंडळातील प्रभावी नेते अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात बालवयापासून होती. वयाच्या १७ व्या वर्षापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे सुधीर भाऊ यांचा प्रवास माझ्या सारख्या नवीन पिढीतील सार्वजनिक क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या तरुणाला प्रेरणा देणार आहे. चंद्रपूरातून दोनदा व बल्लारशाह मधून तीनदा आमदार म्हणून निवडून येणे सोपी बाब नाही. राज्याचे अर्थ, वने व नियोजन मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायम स्मरणात राहील.
पुण्यातील आय.एल.एस. विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असताना मला विधानसभेत एका ज्येष्ठ नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अधिवेशन काळात विधिमंडळातील प्रेक्षक गॅलरीतून राज्यातील अनेक नेत्यांची भाषणे ऐकता आली. २०१८ साली अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर भाऊंना राज्याचे बजेट मांडताना प्रत्यक्ष बघितले. १२२४ दिवस, २९ हजार ३७६ तास जनतेनी सत्तेत सेवा करण्याची संधी दिली अशी सुरवात आणि आमचे काम हेच विकासाची ग्वाही देईल असा समारोप करताना सुधीर भाऊंचे ५४६४ सेकंदांचे भाषण कधी संपले कळलेच नाही. अर्थसंकल्पाचासारखा अवांतर विषय सोप्या व सहजतेने मांडताना साहित्यिक रचनांनी त्यांचे वक्तृत्व संपूर्ण सभागृहाला मोहून टाकणारे होते. माझ्या जिल्ह्यात घडलेले नेतृत्व राज्याचे अर्थकारण सांभाळत असल्याचे बघून मन अभिमानाने भरून आले. अर्थमंत्री असताना एकदा मी सुधीर भाऊंच्या विधानभवनातील केबिनमध्ये गेलो. तिथे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी होती. राज्यभरातून प्राप्त झालेली निवेदन वाचून पत्रावर शेरा देणे, तातडीच्या प्रकरणांच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन करणे आणि प्रचंड व्यस्त असताना देखील भेटायला आलेल्या प्रत्येकाशी स्मितहास्य करीत बोलणे यातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रत्ययास आले.
अधिवेशन काळात विधानभवनातील ग्रंथालयात बसून विधिमंडळातील जुनी भाषणे मी वाचून काढत असे. विरोधी बाकावर असताना सरकारला प्रभावी सूचना देणारा नेता म्हणून भाऊ सभागृहाला सुपरिचित होते. हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेल्याशिवाय शांत न बसणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते देखील सांगतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वेळ घेऊन विधानभवनात त्यांना आम्ही काही विद्यार्थी भेटलो. राज्याचा विधिमंडळात भारतीय जनता पक्षातील कोणता नेता हा सर्वाधिक अभ्यासू आहे असे तुम्हाला वाटते असा प्रश्न मी त्यांना केला. क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नाव घेतले. भाऊंच्या संपर्कात आले पाहिजे असे मला मनोमन वाटे.
कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी लंडन येथील एस.ओ.ए.एस. विद्यापीठात माझी निवड झाली. मात्र वाढत्या कोविड प्रादुर्भावाने महाविद्यालयीन शिक्षणाला अल्पविराम देत चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम सुरू केले आहे.
![]() |
अँड. दीपक चटप |
दरम्यान केंद्र सरकारने कृषी व्यापार संबंधित कायदे पारित केले. देशात या कायद्यांबाबत साधक-बाधक चर्चा होऊ लागली. या कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसली. नव्या कृषी कायद्याची चिकित्सा करणारे छोटेखानी पुस्तक लिहिण्याचा संकल्प केला. शेतकरी चळवळीतील नेते, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीतील सदस्य आदींकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. तीनही कृषी कायद्यांचा अभ्यास करून "कृषी कायदे: चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज" हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाबाबत प्रतिक्रिया मिळावी म्हणून सुधीर भाऊंची भेट घेतली. त्यावेळी सुधीर भाऊंशी पहिल्यांदा संवाद साधला. साधारण महिनाभरानंतर सकाळी सात- आठ वाजता भाऊंचा कॉल आला. अमुक पान क्रमांकावर लिहिलेले पाचवे वाक्य, त्या पान क्रमांकातील जमीन धारणेचा मुद्दा महत्त्वाचे असून त्याचा संदर्भ नमुद करावा, कायद्याची सकारात्मकता मांडतांना कृषी न्यायाधिकरणाची व्यक्त केलेली संकल्पना आदींबाबत जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट भाष्य केले. पुस्तक प्रकाशित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे असे त्यांनी सांगितले. संपूर्ण पुस्तक भाऊंनी वाचून काढले व व्यस्ततेतून अभिप्राय देखील दिला. काही दिवसांनंतर सुधीर भाऊंचे स्वीय सहाय्यक तथा चंद्रपुरच्या नाट्यसृष्टीतील सुपरिचित व्यक्तिमत्व अजयजी धवने यांचा मला फोन आला. सुधीर भाऊंचा निरोप आहे की, तुमचे पुस्तक विधानसभेतील सर्व आमदारांना पाठवायचे असून राज्यातील काही अभ्यासक व जाणकारांना देखील द्यायचे आहे. साधारण दीड ते दोन हजार प्रती आमच्या कार्यालयात पाठवा आणि त्याचा खर्च सुधीर भाऊ स्वतः देतील असेही त्यांनी कळवले. एकंदरीत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या गुणांना हेरून सुयोग्य कृतींना बळ देणारे व्यक्तिमत्व भाऊंच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले.
सत्ता व संपत्तीचा दर्प इतका मादक असतो की, माणसाला क्लोरोफार्म देण्याची गरज पडत नाही. तो आपोआपच बेशुद्ध पडतो. मात्र सुधीर भाऊ हे अपवादात्मक व्यक्तिमत्व असून कोणत्याही मोहाला बळी पडले नाही. सध्याच्या चंगळवादी राजकारणात सुधीर भाऊंसारखे अभ्यासू वृत्तीचे नेते फार कमी दिसतात. जो स्वतः नेतृत्व करत इतरांचे नेतृत्व घडवतो तो यशस्वी नेता असे म्हटले जाते. राज्याच्या राजकारणात पहिल्या फळीच्या नेत्यांत सुधीर भाऊंनी अढळ स्थान निर्माण केले आहे. येणाऱ्या काळात अभ्यासू वृत्तीचे, गुणाग्रही व संकल्प सिद्धीसाठी कार्यरत राहणारे परिश्रमी नेते नव्या पिढीत निर्माण व्हावे म्हणून सुधीर भाऊंच्या कार्यशैलीचा आदर्श घेतला पाहिजे असे मला वाटते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.