Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'त्या' निर्णयावर राज्य सरकारचा यू-टर्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनलॉकचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार 'त्या' घोषणेवर वडेट्टीवारची गोची अनलॉकबाबत घोषणा करून मंत्रीजी फसले मुख्यमंत्री कार्यालयाच्या...

  • अनलॉकचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
  • 'त्या' घोषणेवर वडेट्टीवारची गोची
  • अनलॉकबाबत घोषणा करून मंत्रीजी फसले
  • मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्टीकरणामुळे झाली गोची
  • नागपुरात पोहचताच केली सारवासारव
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
राज्यात लॉकडाऊन सारखे निर्बंध उठवण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. अनलॉक बाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याने याबाबतची घोषणा करणारे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची पंचाईत झाली आहे. वडेट्टीवार यांना काही तासांतच त्यावर परत एकदा स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. या सर्वात सरकारपातळीवर निर्णय प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत उद्यापासून अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे व हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले होते. त्यांनी निर्बंध कसे शिथील होणार याचा संपूर्ण तपशीलही दिला होता. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आलं आणि वडेट्टीवार यांची गोची झाली. 'राज्यात निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे', असे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विजय वडेट्टीवार हे नागपूरला रवाना झाले होते. दरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाबाहेर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांची गर्दी झाली होती. राज्याचा अनलॉक प्लान जाहीर करणाऱ्या वडेट्टीवार यांनी यावेळी सारवासारव करत मोजकीच प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र अनलॉकचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हानिहाय पाच स्तरीय अनलॉक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत हा आदेश जारी होईल', असे वडेट्टीवार म्हणाले. उद्यापासून १८ जिल्हे अनलॉक होणार का, असे विचारले असता त्यावर काहीच प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही.

निर्बंधांबाबत सरकारचे स्पष्टीकरण
करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथील करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक द चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथील करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथील करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. या काम चलावु सरकार मुळे जनतेला अशा प्रश्न पडतोय कि मुख्यमंत्री कोण आहे ते समजून येत नाही,,,,,,

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top