- माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण माझे संरक्षण
- मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे - दिव्यांगाच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था
- म्युकरमायकोसिससाठी कोविडमुक्त 10 हजार रुग्णांचे ट्रेसिंग
यवतमाळ -
संभाव्य तिसऱ्या लाटेपासून जिल्ह्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढविणे आणि जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करून घेणे हा एकमेव पर्याय आहे. शहरी भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे मात्र ग्रामीण भागात लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. नागरिकामध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण माझे संरक्षण' ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेला सर्व आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनीधी अशा सर्वांनी आपापल्या
कार्यक्षेत्रात सहभागी होऊन सहकार्य करावे,असे आवाहन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदीताई पवार, आमदार सर्वश्री ॲड. निलय नाईक, प्रा अशोक उईके, संजीव रेड्डी बोदकूरवार, नामदेवराव ससाणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे उपस्थित होते.
गाव पातळीवर कोरोना काळात स्थापन केलेल्या समित्यांनी चांगले काम केले आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका या सर्वांनी प्रयत्न केल्यास प्रत्येक गावाचे लसीकरण पूर्ण होईल. त्याचबरोबर 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी योग्य नियोजन करण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येत असून नागरिकांना त्यावर नोंदणी करणे सुलभ होईल असेही ते म्हणाले. गावातील दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण त्यांच्या घरी जाऊन करणे शक्य नसल्यास त्यांच्या गावात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
तिसऱ्या लाटेमध्ये मुलांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 60 खाटांचे तर महिला रुग्णालयात 20 खाटांचे नियोजन केले आहे. मुलांसाठी लागणारे व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजन बेड सोबतच त्यांच्या पालकांना सोबत राहता येईल अशी व्यवस्था तयार करण्यात येत आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या सर्व सुविधा कार्यान्वित होतील असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयातील एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून जुलै महिन्यात उर्वरित प्रकल्प पूर्ण होतील. प्रत्त्येक ग्रामीण रुग्णालयाला किमान 15 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा येथे खाटांची संख्या वाढविण्यात येत असल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे 65 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 26 बरे झाले असून 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांमध्ये आपल्या जिल्ह्यात मृत्यू दर जास्त असल्याबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी मृत्यू झालेले रुग्ण शेवटच्या स्टेज मध्ये असताना रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात मागील दोन महिन्यात बऱ्या झालेल्यापैकी आतापर्यंत मधुमेह, स्टेरॉईड चा वापर, ऑक्सिजनची आवश्यकता भासली अशा 10 हजार रुग्णांना शिक्षकांच्या चमूने फोन करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. यामधून 25 रुग्ण ट्रेस झाले असून त्यांना लवकर औषधोपचार मिळाला असून असे ट्रेसिंग अजूनही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. यावेळी आमदारांनी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत पीक कर्क वाटप, रासायनिक खतांचा पुरवठा आणि पांदण रस्त्यांचा विषय उपस्थित केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले तर पांदण रस्त्यांचे सर्व प्रस्ताव याच वर्षी पूर्ण करण्याची हमी त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती देताना दुसऱ्या लाटेत सुमारे 55 हजार रुग्ण बाधित झालेत. सध्या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात सर्वच व्यवहार पूर्ण वेळ सुरू आहेत. लोकांना कोविड नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात शासनाकडून 18 आणि खनिज निधी व आमदार निधीतून 16 अशा 34 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत असे सांगितले. या बैठकीला आरोग्य यंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.