- पूल वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली
बल्लारपुर -
कोठारी- तोहंगाव या मार्गावरील पाचगाव येथील भलभली नाल्यावरील वळण रस्त्यावर तयार करण्यात आलेला कच्चा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कोठारी - तोहोगाव मार्ग बंद पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपीपरी अंतर्गत पाचगाव भलभली नाल्यावर पुलाचे बांधकाम अत्यंत कासवगतीने मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. सध्या सदर बांधकाम अर्धवट असून रहदारीचा वळण रस्ता तयार करून नाल्यावर कच्चा पूल बनविण्यात आला होता. पावसाळ्यात या नाल्यावर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येत असल्याचा अंदाज अभियंत्यांना असून सुद्धा लहान भोंगे टाकून निकृष्ट पूल तयार करण्यात आला. पावसाच्या पाण्याने हा पूल टिकणार नाही व कोठारी, परसोडी, पाचगाव, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, लाठी आदी गावची रोजची वाहतूक प्रभावित होऊ शकते. याबाबत एका वृत्तपत्राने 7 जूनला वृत्त प्रकाशित करून अवगत केले होते. त्याकडे संबंधित विभागाने व कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने 11 जून च्या रात्री झालेल्या भयंकर पावसाच्या पाण्यात हा पूल वाहून गेल्याने दिवसभर वाहतूक ठप्प झाली आहे.
कोठारी तोहोगाव मार्गावर परसोडी पचगाव दरम्यान नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नसल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा फटका बसणार होता. बांधकाम विभागाने त्याची वेळीच दखल घेऊन योग्य नियोजन करून वळण रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी परिसरातील जनतेनी केली होती. कोठारी लाठी हा 32 किमीचा जिल्हा मार्ग आहे. या मार्गावर जवळपास 15 गावे येतात. या परिसरातील मुख्य बाजारपेठ कोठारी येत असून याच मार्गाने रोज ये-जा करावे लागते. पुलाचे बांधकाम सुरू असून रोजच्या रहदारीसाठी वळण रस्ता करून त्यावर कच्चा पूल करण्यात आला तो सध्या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने रहदारी पूर्णपणे बंद झाली असल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम अभियंता व कंत्राटदारांच्या नियोजन शून्यतेचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. आता हा पूल बनविण्याची प्रक्रिया सुरू असून लहान भोंग्याचे जागी मोठे भोंगे टाकून तयार केल्यास पुढील कालावधीत वाहतूक सुरळीत राहील अन्यथा पुन्हा मार्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.