- भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. इल्लांची मदत
- वरोरा येथील कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत डॉ. कृष्णा इल्ला आनंद
- डॉ. कृष्णा इल्ला यांनी लसींची गुरुदक्षिणा देऊन आनंदवनला दिली मोलाची मदत
नागपूर -
आनंदवन येथील कृषी महाविद्यालयात शिकलेल्या एका माजी विद्यार्थ्याने आनंदवनातील लसीकरणासाठी ४ हजार कोव्हॅक्सिनच्या कुप्या दिल्या आहेत. या विद्यार्थ्याचे नाव आहे भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एम. इल्ला. कोरोनासाठी देशातील पहिल्या लसीची निर्मिती करणारे डॉ. कृष्णा इल्ला वरोरा येथील कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून ४ हजार लसींचे डोस आनंदवनात पाठवले.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आनंदवनच्या जीवनचक्राला खीळ बसलेली आहे. अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे दगावले. संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे तथा प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी डॉ. कृष्णा इल्ला यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तेव्हा ४००० लसी मोफत दिल्या. त्यातील २ हजार लसींची पहिली खेप पोहोचली असून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आनंदवन हे एकलव्य तयार करणार विद्यापीठ आहे असे दिवंगत बाबा आमटे यांचे मत होते. असेच एकलव्य असलेले डॉ. कृष्णा इल्ला यांनी लसींची गुरुदक्षिणा देऊन आनंदवनला मोलाची मदत केलेली आहे.
कुष्ठरोग्यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत अवगत करण्यासाठी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना कृषी शिक्षण देण्यासाठी १९६५ मध्ये आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाला उज्ज्वल यशाची परंपरा आहे. अनेक विद्यार्थी आज चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. कृष्णा इल्ला हे होत. डॉ. कृष्णा इल्ला हे मूळचे आंध्र प्रदेशातील छोट्याशा गावातील असून आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.