- गुरुदेव भक्तांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध नोंदविला
यावेळी बोलताना विजय चिताडे म्हणाले,चंद्रपुर जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे. जीवनभर त्यांनी मद्यप्राशन चा विरोध करीत व्यसनमुक्ती साठी जीवन दिले. हेच नाहीतर व्यसनमुक्तीचे समर्थन करणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. त्या भूमीतील मातृशक्तीने क्रांतिभूमी चिमूर ते नागपूर विधानभवन पायपीट करीत दारूचा विरोध दर्शवित दारूबंदीची मागणी केली. दारूमूळे उध्वस्त होणारे संसार वाचवा. कपाळाचं कुंकु शाबूत ठेवा अशी मागणी करीत एल्गार पुकारला. आणि याची दखल घेत २०१५ ला दारूबंदी लागू झाली. याचे गुरुदेव भक्तांनी स्वागत केले. परंतु महाविकास आघाडी सरकारने एका कॅबिनेट मंत्र्याच्या अट्टहासापोटी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला, ही बाब जिल्ह्यातील सर्व मातृशक्तीचा अपमान करणारी आहे. आम्ही या निर्णयाचा व पालकमंत्र्यांचा तीव्र निषेध करतो. दारुबंदीसह व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलतांना गुरुदेव सेवा मंडळच्या महिला प्रतिनिधी प्राचार्य प्रज्ञा गंधेवार म्हणाल्या, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही खेळी आहे. अवैध दारू विकली जाते, २५ हजार पुरुष, ४ हजार महिला व ३०० च्यावर बालकांवर गुन्हे दाखल झाले हे कारण पुढे करीत दारूबंदी उठविल्याची घोषणा केली. हेच नाहीतर त्यांनी महसूल बुडण्याचा विषय पण मांडला. मुळात हे कारण नसून प्रचलित दारुविक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होय. असे त्या म्हणाल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. महिलांचा सन्मान करा, दारूबंदी लागु करा…अशी घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
गुरुदेवभक्तांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.यावेळी गुरुदेवभक्त माया मांदाडे, अन्याजी ढवस यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
आंदोलनाचे प्रास्ताविक उषा मेश्राम यांनी तर संचालन व आभार कल्पना गिरडकर यांनी केले.आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.