- तलवारीने सपासप वार
नागपूर -
पूर्ववैमनस्यातून तिघांनी डोळ्यांत मिरचीपूड फेकून युवकावर चाकू व तलवारीने हल्ला केला. ही थरारक घटना खलासी लाइन येथे रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अनिकेत मुकेश अंगलवार वय २७, खलासी लाइन, असे जखमीचे नाव आहे. अनिकेतवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सदर पोलिसांनी उमेश ऊर्फ अम्मू मनोजकुमार पैसाडेली वय २५, कडबी चौक, मॉरीस आरिकस्वामी फ्रान्सिस आणि फरहान ऊर्फ गट्टू फिरोज बेग दोन्ही रा. कॅथलिक क्लब, खलासी लाइन या तिघांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी अनिकेतचा उमेशसोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांना ठार मारण्याची धमकी दिली होती. रविवारी रात्री उमेश व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी अनिकेतला गाठले. डोळ्यांत मिरचीपूड फेकून अनिकेतच्या पोटावर मानेवर व पाठीवर चाकू व तलवारीने सपासप वार केले. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. हल्लेखोर पसार झालेत. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.