Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: इरई धरणाचे दरवाजे उघडले; सलग पावसाने संकट वाढले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इरई धरणाचे दरवाजे उघडले; सलग पावसाने संकट वाढले नाल्यात अडकलेल्या १२ जणांची सुटका; झरपट नदीवरील पूल वाहून गेला राजुरा बल्लारपूर  व्हाया  बाम...
इरई धरणाचे दरवाजे उघडले; सलग पावसाने संकट वाढले
नाल्यात अडकलेल्या १२ जणांची सुटका; झरपट नदीवरील पूल वाहून गेला
राजुरा बल्लारपूर व्हाया बामणी मार्ग बंद; नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०३ सप्टेंबर २०२५) -
        जिल्ह्यात सलग पावसामुळे इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून तटीय भागात पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी दिवसभर जोरदार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. जिल्ह्यातील सर्व जलाशय शंभर टक्के भरून वाहू लागल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.

        मंगळवारी सकाळी ७ वाजता इरई धरणाच्या जलस्तरात वाढ झाल्याने ३ दरवाजे १ मीटर व ४ दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले. धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पद्मापूर, किटाली, मसाला, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोली, चिचेली, कढोली, पायली, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आदी गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाल्यात अडकलेल्या १२ जणांची सुटका
        कारवा बल्लारपूर रोडवरील नाल्यात आलेल्या पुरामुळे १२ जण अडकले होते. यामध्ये महिला व लहान मुलेही होती. सोमवारी रात्री १२ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तहसील कार्यालयाची टीम बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाली. सर्वांना सुरक्षित बाहेर काढून सोमाजी नाईक आश्रमशाळेत राहण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर तहसील बल्लारपूर कार्यालयाच्या वाहनाने त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले.

झरपट नदीवरील पूल वाहून गेला
        शहरालगत झरपट नदीवरील हनुमान खिडकीजवळ बांधण्यात आलेला पूल मंगळवारी सकाळी पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला. त्यामुळे पठाणपुरा गेटमार्गे ग्रामीण भागाशी असलेला संपर्क तुटला आहे.

पूल व मार्गांवर वाहतूक बंद
        राजुरा - बल्लारपूर व्हाया बामणी मार्गावर वर्धानदीची पातळी वाढल्याने मार्ग बंद करण्यात आला असून सास्ती मार्गे वाहतूक सध्या सुरु आहे. वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे नदीवरील पुलावर पाणी आल्याने चारगाव खुर्द–अर्जुनी मार्ग बंद झाला आहे. भद्रावती तालुक्यातील गुंजाळा येथे घरात पाणी शिरून नुकसान झाले असून गुंजाळा–कचराळा मार्ग बंद करण्यात आला आहे. धानोरा–भोयेगाव, फिस्कुटी–चिचाळा, चिरोली–केलझर, कोसरसार–बोडखा, इरई–भारोसा, भोयेगाव–धानोरा, पलसगाव–कवडजी आदी मार्गांवर वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसाचा आकडा
        चंद्रपूर – ७२.९ मिमी, मूल – ३५.२ मिमी, गोंडपिपरी – २६ मिमी, वरोरा – ७६.३ मिमी, भद्रावती – ७७.१ मिमी, चिमूर – ४१.२ मिमी, ब्रम्हपुरी – १२.७ मिमी, नागभीड – ४७.३ मिमी, सिंदेवाही – ४७.१ मिमी, राजूरा – ४२.८ मिमी, कोरपना – ४९.८ मिमी, सावली – ३०.८ मिमी, बल्लारपूर – ९०.५ मिमी, पोंभूर्णा – ५३.९ मिमी, जिवती – ४५.२ मिमी. जिल्ह्यात सरासरी ५० मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

#ChandrapurFloods #IraiDam #HeavyRainfall #MaharashtraFloodAlert #RescueOperation #ChandrapurUpdates #Monsoon2025 #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top