आठ तास चर्चेनंतर तोडगा, जीआरएल कंपनीकडून २४ लाखांची मदत जाहीर
अपघातातील मृतकांना शोकाकुल वातावरणात निरोप – गावकऱ्यांचा अश्रू अनावर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ३० ऑगस्ट २०२५) -
गडचांदूर मार्गावरील कापणगावजवळ बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये म्हणजे एकूण २४ लाख रुपयांची मदत तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे जीआरएल कंपनीने मान्य केले. तहसीलदारांच्या दालनात मृतकांचे कुटुंबीय, जीआरएल कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला. तत्काळ प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजुरा येथून पाचगावकडे जाणाऱ्या ऑटोला समोरून येणाऱ्या जीआरएल कंपनीच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोचालक प्रकाश मेश्राम (वय ५०, रा. पाचगाव), रवींद्र हरि बोबडे (वय ४८, रा. पाचगाव), शंकर कारू पिपरे (वय ५०, रा. कोची), वर्षा बंडू मांदळे (वय ४१, रा. खामोना), तनु सुभाष पिंपळकर (वय १८, रा. पाचगाव) व ताराबाई नानाजी पापुलवार (वय ६०, रा. पाचगाव) या सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या निर्मला रावजी झाडे (वय ५०, रा. पाचगाव) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर भोजराज महादेव कोडापे (वय ४०, रा. भुरकुंडा) यांच्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शुक्रवारी सकाळपासूनच पाचगाव, कोची व खामोना येथील गावकरी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जमले होते.
या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. देवराव भोंगडे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, माजी आमदार सुभाष धोटे, भाजप नेते सतीश धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तहसीलदार प्रकाश गोंड, ठाणेदार सुमित परतेकी, जीआरएल कंपनीचे प्रतिनिधी अभिषेक दुबे, शिवसेनेचे बबन उरकुडे, माजी जिप सदस्य सुनील उरकुडे, सुरेश रागीट, रंजन लांडे, बापूराव मडावी, मारोती चन्ने, हेमंत झाडे, अजय राठोड, दिलीप गिरसावळे, प्रफुल घोटेकर आदींसह गावकरी उपस्थित होते. आठ तास चाललेल्या चर्चेनंतर कंपनीने मदतीस मान्यता दिली आणि मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
ऑटो चालकावर गडचिरोली जिल्ह्यात अंत्यसंस्कार
अपघातात मृत पावलेले शंकर पिपरे (रा. कोची) व वर्षा मांदळे (रा. खामोना) यांच्यावर स्थानिक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर ऑटो चालक प्रकाश मेश्राम यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील येवली येथे अंत्यसंस्कार पार पडले.
नशीब बलवत्तर म्हणून दोघे बचावले
अपघातात दोन जणांचा जीव थोडक्यात वाचला. निर्मला झाडे व भोजराज कोडापे यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
#GadchandurAccident #RajuraTragedy #RoadSafety #SupportForVictims #GRLCompensation #ChandrapurNews #TragicLoss #hansrajahir #advsanjaydhote #sudarbhannimkar #subhashdhote #babanurkude #arundhote #satishdhote #devraobhongale #omprakashgond #sumitparteki #sunilurkude
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.