Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कंपन्यांनी सीएसआर निधीतून साधनसामुग्री द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कंपन्यांनी सीएसआर निधीतून साधनसामुग्री द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार उद्योग राज्यमित्र कार्यक्रम चंद्रपुरात – रोजगाराची नवी दारे खुली आमचा वि...
कंपन्यांनी सीएसआर निधीतून साधनसामुग्री द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार
उद्योग राज्यमित्र कार्यक्रम चंद्रपुरात – रोजगाराची नवी दारे खुली
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २८ ऑगस्ट २०२५) -
        महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेले चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. या संपत्तीच्या आधारे राज्य सरकारमार्फत अनेक उद्योगांना चालना मिळत असून, समृद्धी महामार्गाचा विस्तार व पोंभुर्णा एमआयडीसीसारख्या उपक्रमांमुळे स्थानिक उद्योगविश्वात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्योग क्षेत्रात स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा, असे निर्देश दिले.

        जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत आमदार मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनूले, कामगार मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, नम्रता ठेमस्कर तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

        मुनगंटीवार म्हणाले की, पारंपारिक कोर्सेसऐवजी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्यास युवक जागतिक स्तरावर रोजगार मिळवू शकतील. आयटीआय विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात अप्रेंटिस म्हणून संधी द्यावी. प्राचार्य व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील १६ आयटीआय उद्योगांनी दत्तक घ्याव्यात, तसेच सीएसआर निधीतून आवश्यक टूल्स आणि आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

      बल्लारपूर आयटीआयला त्रिवेणी इंजिनिअरिंगने दत्तक घेण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच प्रत्येक इन्स्टिट्यूटची क्षमता, भौतिक व शैक्षणिक संसाधनांची माहिती बुकलेटच्या स्वरूपात तयार करून नियमित पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भविष्यात ड्रोनचा वापर कृषी क्षेत्रात प्रभावी ठरेल, म्हणूनच ड्रोन ऑपरेटरचा दोन महिन्यांचा कोर्स सुरू करण्यात येणार आहे. बचत गटातील महिलांना ड्रोन प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचाही विचार केला जाईल. 

        आगामी काळात उद्योग राज्यमित्र हा कार्यक्रम चंद्रपुरात आयोजित होणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांनी आपली मनुष्यबळाची मागणी कळविल्यास त्या अनुषंगाने युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगारात प्राधान्य दिले जाईल, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

#ChandrapurJobs #SkillDevelopment #SudhirMungantiwar #YouthEmployment #CSRInitiative #DroneTraining #IndustryGrowth #SkillIndia #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top