- मद्यपी शिक्षकामुळे कुर्ली येथील शाळेवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार
- शिक्षण विभाग दखल घेणार काय? चिमुकल्यांच्या सवाल....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील कुर्ली प्राथमिक शाळेतील एक सहाय्यक शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत येत असून त्यांनी कधीही ऑनलाईन अथवा ऑफलाइनही वर्ग घेतले नाही. या शिक्षकामुळे आमच्या गावातील शालेय विद्यार्थ्यांना चुकीचे वळण लागत असून अभ्यासाप्रती विद्यार्थ्यांना कसलीही ओढ लागलेली नाही. यामुळे या शिक्षकाची तातडीने बदली करावी, अशी मागणी कुर्ली येथील नागरिकांनी राजकिय नेते, शिक्षण विभाग यांचेकडे केली. हा शिक्षक गावात आल्यास आज दिनांक 13 डिसेंबर पासून शाळेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकरी आणि शिक्षण समितीने दिला होता. मात्र याची दखल शिक्षण विभागाने न घेतल्याने अखेर आज एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने आज शाळेसमोर सभा घेऊन या शिक्षकाची बदली होत पर्यंत कुणीही विद्यार्थी शाळेत जाणार नसल्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुर्ली येथे दोन शिक्षकी शाळा असून सहाय्यक शिक्षक बाबू हरी राठोड हे मद्य पिऊन शाळेत गैरवर्तन करीत असतात, असा आरोप गावकर्यांनी केला आहे. हे शिक्षक मागील एक वर्षापासून कुर्ली येथे कार्यरत असून आजपर्यंत कधीही त्यांनी विद्यार्थांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अध्यापन योग्य प्रकारे केलेले नाही. पूर्वसूचना न देता सतत गैरहजर राहतात, त्यामुळे विद्यार्थ्यावर चुकीचे संस्कार होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. या शिक्षकाचे यापूर्वीच्या शाळेतील वर्तनही असेच होते आणि त्यांचे वर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती तक्रारीत गावकऱ्यांनी नमूद केली आहे. दिनांक 4 डिसेंबरला शाळा व्यवस्थापन समितीची सभा होऊन या शिक्षकाची तातडीने बदली करावी, असा ठराव एकमताने मंजूर करून शिक्षण अधिकार्यांना पाठविण्यात आला. मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. या शिक्षकाचे प्रताप शिक्षण प्रशासनाला माहित असुनही सदर शिक्षकाची नेमणुक केवळ सामावून घेण्यासाठी करण्यात आली की काय, अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
राजुरा तालुक्यातील कुर्ली हे गाव शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असून यापूर्वी येथील विद्यार्थ्यांनी शिकून गावाचे नाव मोठे केले आहे. मात्र या व्यसनी व बेजबाबदार शिक्षकामुळे गावकरी त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होत नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या शिक्षकाला हटवून दुसऱ्या योग्य शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी कळकळीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या मद्यपी शिक्षकावर कार्यवाही करून त्याचे येथून तातडीने स्थानांतरण करावे, या मागणीसाठी आज 13 डिसेंबर ला सकाळी 11 वाजता शाळेच्या समोर गावकऱ्यांची सभा झाली. या सभेत मागणी पूर्ण होतपर्यंत विद्यार्थ्यांंना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे आजही हा शिक्षक मद्य प्राशन करून आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर मुख्याध्यापक काहीही बोलत नसल्याचे सांगण्यात आले. सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर जिवने, सामाजिक कार्यकर्त्यां संगीता धोटे, माजी सरपंच श्रीकुमार नळे, बबन उमरे, विनोद वनकर, भारत भगत, अश्विनी जिवने, योगिता उमरे, अरविंद आत्राम, अतुल नळे, आम्रपाली मेश्राम, अनिता जिवने, उज्वला उमरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.