आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०३ ऑक्टॉबर २०२६) -
आदिवासी टायगर सेना, विदर्भ यांच्या वतीने विदर्भस्तरीय आदिवासी गुणवंत विद्यार्थी सत्कार, मार्गदर्शन, समाजबांधवांचा सत्कार तसेच भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपुरात करण्यात आले आहे. बल्लारपूर रोडवरील बंगाली कँप परिसरातील आशिर्वाद सभागृहात सकाळी ११ ते रात्री ११ या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शन, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोकराव उईके यांच्या हस्ते होणार आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम या सह-उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी एकता परिषद, गुजरातचे राष्ट्रीय महासचिव अशोक चौधरी राहणार आहेत. आदिवासी टायगर सेनेच्या विदर्भ अध्यक्ष मिनलताई आत्राम या स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळणार आहेत. विशेष अतिथी म्हणून गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, केळापूरचे आमदार प्रा. राजू तोडसाम, माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि मध्यप्रदेशातील आदिवासी विचारवंत पोरलाल खरते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिकारी व मान्यवरांचे मार्गदर्शन
या सोहळ्याला प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, चंद्रपूर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, चिमूर प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, गडचिरोली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, शबरी महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र भदाने, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आणि जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम हे उपस्थित राहून विद्यार्थी व समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रांतील सनदी अधिकारी, डॉक्टर, सामाजिक विचारवंत, उद्योजक तसेच आदिवासी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांचीही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विविध परीक्षांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाल, करिअरच्या संधी आणि विविध क्षेत्रांतील प्रगतीबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रात्री रंगणार गोंडी ऑर्केस्ट्राचा सांस्कृतिक सोहळा
दिवसभराच्या सत्कार आणि मार्गदर्शन सत्रानंतर रात्री ७ वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि गोंडी संगीताची ओळख या माध्यमातून उपस्थितांना करून देण्यात येणार आहे. तेलंगणा येथील सुपरहिट गोंडी गीत गायक मेघराज मेश्राम आणि नागपूर येथील कु. साक्षी धुर्वे यांच्या सुमधुर गोंडी ऑर्केस्ट्राचा विशेष कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्यामुळे रात्रीचा सांस्कृतिक सोहळा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
विदर्भस्तरीय आदिवासी गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाजबांधवांचा सन्मान, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक महोत्सवाला आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी टायगर सेनेच्या विदर्भ अध्यक्ष मिनलताई आत्राम यांनी केले आहे. चंद्रपुरात आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव आणि आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचा संदेश दिला जाणार असल्याने या कार्यक्रमाकडे विदर्भातील आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.
#आदिवासीटायगरसेना #आदिवासीटायगरसेनाविदर्भ #चंद्रपूर #चंद्रपूरन्यूज #ChandrapurNews #Chandrapur #आदिवासीसमाज #आदिवासीविद्यार्थी #गुणवंतविद्यार्थी #विदर्भ #Vidarbha #आदिवासीमहोत्सव #गोंडीसंस्कृती #गोंडीगीत #गोंडीऑर्केस्ट्रा #आदिवासीसंस्कृती #विद्यार्थीसत्कार #चंद्रपूरकार्यक्रम #AdivasiTigerSena #AdivasiCulture #GondiCulture #GondiMusic #VidarbhaNews #MaharashtraNews

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.