Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ‘नव्या संस्थानिकांवर रेसिडेंटची छुपी नजर’; डॉ. शरद बाविस्कर यांचा सावधगिरीचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा मुक्तीदिन सोहळ्यात लोकशाहीसमोरील आव्हानांवर परखड भाष्य आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२६) -         हैदराबाद-मरा...
राजुरा मुक्तीदिन सोहळ्यात लोकशाहीसमोरील आव्हानांवर परखड भाष्य
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १८ सप्टेंबर २०२६) -
        हैदराबाद-मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा देत आणि लोकशाहीच्या वर्तमानातील आव्हानांचा वेध घेत राजुरात मुक्तीदिन सोहळा उत्साहात पार पडला. राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात स्वातंत्र्याच्या इतिहासासोबतच नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये, सामाजिक विषमता, विकासातील असमतोल, नव्या पिढीची भूमिका आणि लोकशाहीसमोरील विविध प्रश्नांवर मान्यवरांनी विचार मांडले.

          नवी दिल्ली येथील प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सावध राहण्याचे आवाहन केले. “लोकशाहीत प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असून सर्वांच्या उत्कर्षाची अपेक्षा असते. नागरिकांचे स्वातंत्र्य जपणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे. मात्र आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासारखे ज्वलंत प्रश्न बाजूला पडत असताना शोषणव्यवस्था आणि जुलूमशाही अधिक बळकट होताना दिसत आहे,” असे प्रतिपादन डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.

        संविधानाच्या चौकटीत देशाचे शासन चालणे आवश्यक असल्याचे सांगताना डॉ. बाविस्कर यांनी इतिहासातील ‘रेसिडेंट’ व्यवस्थेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, इंग्रजांच्या काळात रेसिडेंटच्या माध्यमातून संस्थानिकांवर नियंत्रण ठेवले जात होते. धोरणांनुसार न वागणारी संस्थाने खालसा केली जात. आजही नव्याने काही ‘संस्थानिक’ निर्माण झाले असून त्यांच्यावर रेसिडेंटची छुपी नजर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रवृत्ती लोकशाहीसाठी मारक ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

        स्वातंत्र्याच्या काळात काही काळ अदृश्य झालेल्या, मात्र नंतर विषमता आणि लोकशाहीविरोधी प्रवृत्तींच्या माध्यमातून पुन्हा डोके वर काढणाऱ्या शक्तींबाबतही त्यांनी सावध केले. कर्करोगातील जंतूंचे उदाहरण देत अशा प्रवृत्ती पुन्हा सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमंत माने होते. माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस कुमार सुशांत, नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती तिरूपती इंदूरवार, डॉ. पदमा राजपूत, प्राचार्य संभाजी वारकड, ॲड. चंद्रमनी वाघमारे, मुकेश मासुरकर, रमेश नळे, संदीप जैन, सुदर्शन दाचेवार, दिलीप सदावर्ते, स्वरूपा झंवर, डॉ. उमाकांत धोटे, प्रा. विशाल मालेकर आणि प्रा. हेमचंद्र दुधगवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमंत माने यांनी हैदराबाद-मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास उलगडताना वर्तमान परिस्थितीवरही भाष्य केले. “आपल्याला पुन्हा तत्कालीन वसाहतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी नागरिकांच्या वाढत्या जबाबदारीवर भर दिला.

        विदर्भाच्या विकासाचा मुद्दा मांडताना श्रीमंत माने यांनी राज्यातील विकासातील असमतोलाकडे लक्ष वेधले. नव्या पिढीचा उल्लेख करताना त्यांनी ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या पिढ्यांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले.

        “दोन पिढ्यांमध्ये अंतर असते, मात्र नवी पिढी प्रश्न विचारणारी, प्रचंड परिश्रम करणारी आणि खोट्या बाबी सहन न करणारी आहे. त्यामुळे या पिढीकडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत,” असे श्रीमंत माने म्हणाले.

        माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी स्वातंत्र्याची संकल्पना, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांचा ऊहापोह केला. मुक्तीदिन हा राजुरावासीयांसाठी आनंद आणि अभिमानाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

        माजी आमदार सुभाष धोटे यांनी विदर्भाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करताना निधीअभावी विकासकामे रखडत असल्याचे मत व्यक्त केले. मुक्तिसंग्राम दिनाची सुट्टी मिळविण्यासाठी ॲड. वामनराव चटप यांनी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.

        राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस कुमार सुशांत आणि डॉ. पृथ्वीराज राजपूत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

        मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचे स्मरण आणि वर्तमानातील कर्तृत्वाचा गौरव या दोन्ही परंपरा जपत यावेळी सहा मान्यवरांना ‘राजुरा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पिलाजी साळवे, डॉ. राहूल मस्की, डॉ. सिद्धांत कातकर, डॉ. सुप्रिया बोबडे-सावलिया, डॉ. नारायण माने आणि सरिता जयपूरकर यांना ‘राजुरा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीचे संयोजक अनिल बाळसराफ यांनी केले. संचालन प्रा. डॉ. अर्चना जुनघरे यांनी केले, तर आभार कैलास उराडे यांनी मानले. आरोही संगीत विद्यालय आणि अल्का सदावर्ते यांच्या चमूने स्वागतगीत सादर केले. राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीच्या या उपक्रमाचे यंदाचे १९ वे वर्ष होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाच्या स्मृती जागविण्यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि विद्वान मान्यवरांचे व्याख्यान या सोहळ्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. यावेळी प्रा. सुनिता जमदाडे, लता बोबडे, प्रा. भावना रागीट, बी. यु. बोर्डेवार, दिनेश पारखी, गणेश बेले, वामन साळवे, पांडूरंग नंदूरकर, महेंद्र बोबडे, क्रिष्ण कुमार आणि सुनिल रामटेके यांच्यासह नागरिक, महिला तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

#RajuraMuktiDin #RajuraMuktiSangram #RajuraNews #Rajura #ChandrapurNews #Chandrapur #MaharashtraNews #HyderabadMuktiSangram #MarathwadaMuktiSangram #VidarbhaNews #Vidarbha #RajuraBhushan #RajuraMuktiDin2026 #Lokshahi #Maharashtra #AamchaVidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top