विदर्भातील एक हजार पत्रकारांची भंडाऱ्यात हक्क परिषद, पत्रकार ऐक्याचा निर्धार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भंडारा (दि. १४ जुलै २०२६) -
संपूर्ण जगातील लोकशाही व्यवस्था आणि समाजजीवनाचा मजबूत आधार पत्रकारिता आहे. समाजाला दिशा देणारी, सत्तेला जाब विचारणारी आणि सामान्य जनतेचा आवाज बनणारी पत्रकारिता आज विविध आव्हानांच्या विळख्यात सापडली असून तिचा मूलभूत धर्म धोक्यात आला आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, माध्यम संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकारितेशी संबंधित प्रत्येक घटकाने एकत्र येऊन पत्रकारितेच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि अस्तित्वासाठी संघटित संघर्ष उभारण्याची गरज आहे. ही केवळ पत्रकारांची लढाई नसून लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
भंडारा येथे आयोजित विदर्भस्तरीय पत्रकार हक्क परिषद व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेला विदर्भातील सुमारे एक हजार पत्रकारांची उपस्थिती लाभली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, माध्यमांसमोरील सध्याची आव्हाने, बदलत्या माध्यमविश्वातील जबाबदाऱ्या तसेच संघटित पत्रकार शक्तीची गरज या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
संदीप काळे म्हणाले की, परिषद केवळ समस्या मांडण्यासाठी नव्हे तर त्यावर ठोस उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. संघटित पत्रकार हीच सर्वात मोठी ताकद असून पत्रकार एकजुटीने उभे राहिल्यास कोणतीही शक्ती पत्रकारितेचा आवाज दाबू शकणार नाही. पत्रकार हे एकमेकांचे समर्थक नसून सहकारी आहेत. विचारभिन्नता असू शकते, मात्र पत्रकारितेच्या हितासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. पत्रकारिता जिवंत राहिली तरच लोकशाही मजबूत राहील आणि लोकशाही मजबूत राहिली तरच सामान्य नागरिकांचा आवाज कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उद्योजक जयंत गज्जर, उद्योजक जेकी राखलानी, उद्योजक हिम्पल मल्होत्रा, उद्योजक रूपेश टांगळे, जिल्हाधिकारी सावन कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, माजी खासदार सुनील मेंढे आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी परिषदेला उपस्थिती लावली.
कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभागाध्यक्ष व्यंकटेश दुंड्डीवार, भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे, नसीर हाशमी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या. व्हॉईस ऑफ मीडियाच्या पुढाकारातून विदर्भातील पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकारांसाठी विमा संरक्षण, घरकुल योजना, मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य अशा विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिषदेच्या समारोपानंतर गायिका राधा खुडे आणि गायक प्रणय सतलज यांच्या "पाटलाची बैलगाडा" या संगीत कार्यक्रमाने उपस्थित पत्रकार आणि मान्यवरांची मने जिंकली.
#VoiceOfMedia #JournalistRights #PressFreedom #MediaFreedom #Journalism #Vidarbha #Bhandara #Chandrapur #SandeepKale #VOM #PressConference #JournalistUnity #Democracy #MediaConference #MaharashtraNews #BreakingNews #VidarbhaNews #JournalistSafety #VoiceOfMediaIndia #MediaRights #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.