वृद्ध महिलेच्या मालमत्ता प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा / चंद्रपूर (दि. १४ जुलै २०२६) -
राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई प्रभाकरराव मामुलकर (वय ८४) यांच्या कथित मालमत्ता फसवणूक प्रकरणात दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा यांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, उतारवयात मदतीसाठी सोबत ठेवलेल्या सख्या बहिणीच्या मुलासह पाच जणांनी विश्वास संपादन करून एका दिवसात सुमारे पाच कोटी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकारामुळे सुमनताई मामुलकर यांना त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेपासून वंचित राहावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुमनताई मामुलकर यांनी २८ जून २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल होऊन पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सुमनताई मामुलकर यांनी, "जमीन खरेदीसंदर्भातील कागदपत्रे असल्याचे सांगून मला नेण्यात आले. प्रत्यक्षात माझ्याच मालमत्तेची कागदपत्रे करून माझी फसवणूक करण्यात आली. वयाच्या ८४ व्या वर्षी मला माझ्याच संपत्तीतून बेदखल करण्यात आले. संबंधितांवर कठोर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा," अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे राजुरा पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची १४ जुलै २०२६ रोजी भेट घेऊन निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष साजिद बियाबानी, प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य राजेश खेराणी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. एस. उराडे, केवाराम डांगे, मुरलीधर श्रीकोंडावार, राजकुमार ठाकूर, मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष मसूद अहमद, डॉ. के. आर. टेभुर्णे, दादाजी झाडे, प्रभाकर बोबाटे, सर्वानंद वाघमारे, प्रा. बी. यू. बोर्डेवार, कृतिका सोनटक्के, ज्योत्स्ना घोटेकर, प्रज्ञा वैद्य, आनंद चलाख, पद्माकर गोहणे, रवी लिपटे आदी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची बाजू किंवा पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे तपास आणि अधिकृत चौकशीनंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
#SumanTaiMamulkar #PrabhakarraoMamulkar #PropertyFraud #JusticeForSumanTai #RajuraPolice #ChandrapurNews #MaharashtraNews #BreakingNews #AdarshShikshanPrasarakMandal #Collector #Police #LegalAction #VidarbhaNews #AamchaVidarbha #LatestNews #MarathiNews #Justice

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.