''त्या'' नऊ स्थावर मालमत्तांवर पुढील आदेशापर्यंत बंदी
आमचा विदर्भ (वृत्तसेवा)
राजुरा (दि. ०९ जुलै २०२६) -
ज्येष्ठ नागरिकांचे निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात राजुरा येथील उपविभागीय अधिकारी तथा आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश पारित केला आहे. माजी आमदार सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांच्या अर्जावर सुनावणी करत त्यांच्या मालकीच्या नऊ स्थावर मालमत्तांच्या विक्री, हस्तांतरण किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी ९ जुलै २०२६ रोजी अंतरिम आदेश पारित केला. अर्जदारांच्या वतीने ॲड. सी. एच. बोरकुटे यांनी न्यायाधिकरणासमोर बाजू मांडली.
या प्रकरणात अभिजित बबन भुते, शिल्पा अभिजित भुते, आशीष दिलीप नलगे, धनराज नामदेव चिचोलकर आणि बबन गोविंदराव भुते यांना गैरअर्जदार करण्यात आले आहे. अर्जानुसार, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या निधनानंतर संबंधित मालमत्ता वारसाहक्काने सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांच्या नावे झाली. स्वतःच्या देखभालीसाठी त्यांनी त्यांचे भाचे अभिजित बबन भुते यांना घरी ठेवले होते. मात्र, अभिजित भुते यांनी इतर गैरअर्जदारांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या नऊही मालमत्ता स्वतःच्या व इतर गैरअर्जदारांच्या नावे करून फसवणूक केल्याचा आरोप अर्जामध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांनी राजुरा येथील उपविभागीय अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. न्यायाधिकरणासमोर सादर केलेल्या अर्जात संबंधित मालमत्ता गैरअर्जदारांकडून विक्री अथवा अन्य मार्गाने हस्तांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यावर गैरअर्जदारांची बाजू विचारात घेण्यात आली. तसेच उपलब्ध कागदपत्रे, नोंदी व प्राथमिक बाबींचा अभ्यास करून उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी न्यायाधिकरणाला प्राप्त अधिकारांचा वापर करत संबंधित नऊ स्थावर मालमत्तांच्या विक्री, हस्तांतरण, फेरफार किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश पारित केला.
न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाची प्रत अर्जदार, तहसील कार्यालय तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायाधिकरणासमोर होणार असून अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित मालमत्तांवर कोणताही व्यवहार करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
काय होत प्रकरण? वाचण्याकरिता हि बातमी वाचा
#Rajura #SumanTaiMamulkar #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #PropertyDispute #SeniorCitizenAct #TribunalOrder #RevenueDepartment #LegalNews #BreakingNews #VidarbhaNews #AamchaVidarbha #LatestNews #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.