मतदानासाठी 2 ते 3 तासांसाठी द्यावी लागेल सवलत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १५ नोव्हेंबर २०२४) -
महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जसे सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापनांनी, कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत देण्यात यावी. मात्र याबाबत संबंधित आस्थापनेस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीना लागू राहील. (खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगहे, अन्नगृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.)
वरील मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तींच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी 2 ते 3 तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत आस्थापनेस संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना घेणे आवश्यक राहील.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने खाजगी कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेर्ल्स यांनी वरीलप्रमाणे तरतुदीचे पालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. या संदर्भात कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, चंद्रपूर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्षात किंवा ई-मेल द्वारे assttcommrchd@gmail.com या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी केले आहे.
#MaharashtraGeneralElection2024 #voting #voters #establishments #Shops #commercialestablishments #hotels #restaurants #theatres #industrialundertakings #factories #Payleave #paidvacation #DistrictElectionOfficers #AssemblyGeneralElection #AssistantLaborCommissioner #complaint
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.