Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकूण ३८ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १६ मे २०...

एकूण ३८ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ मे २०२४) -
        सिंचनाच्या संदर्भातील प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये आसोलामेंढा सिंचन प्रकल्पातील दिघोरी व गोवर्धन शाखा कालव्याच्या कामांचा समावेश आहे. आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या दिघोरी शाखा कालव्यामुळे २० गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे, तर गोवर्धन शाखा कालव्यामुळे १८ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे सिंचनासाठी पाण्याची अडचण भासू नये, यासाठी कालव्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

        आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाची उर्वरित कामे जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यात मुख्य कालव्यापासून सा. क्र. ४१३६० मीटरवरून दिघोरी शाखा कालवा निर्गमित होतो. दिघोरी शाखा कालव्यावरील वितरण प्रणालीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच टक्के काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, याकडे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. याअंतर्गत २० गावांना सिंचनाचा लाभ मिळणार असून यामध्ये मुल तालुक्यातील खंडाळा रै, चक बेंबाळ, पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी, थेरगाव, चक घोसरी, फुटाणा मोकासा, चक फुटाणा, कोसंबी चक, वेळवा चक, वेळवा माल, सेल्लूर चक, सेल्लूर नागरेड्डी, दिघोरी, नवेगाव चक, नवेगाव मोरे, खापरी चक, खापरी रीठ, चक ठाणेवासना, मोहाळा रै, भिमणी आदी गावांचा समावेश आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना दुबार सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहेत, याकडेही ना. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आहे.

        त्याचप्रमाणे मुख्य कालव्याच्या सा. क्र. ४१३६० मीटरवरून गोवर्धन शाखा कालवा निर्गमित होतो. याची लांबी १६.३२ किलोमीटर असून संपूर्ण कालवा पारंपरिक पद्धतीचा होता. ब्रिटीशकालीन असल्यामुळे हा कालवा खचलेल्या अवस्थेत होता. त्यामध्ये दुरुस्ती करून गोवर्धन शाखा कालव्यावरून एकूण १५ उपवाहिन्या बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे निर्गमित होणार आहेत. याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून जून अखेरपर्यंत उर्वरित १० टक्के कामे पूर्ण करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. याअंतर्गत मुल तालुक्यातील बेंबाळ, बोंडाळा बुज, बोंडाळा खुर्द, नांदगाव, गोवर्धन, बोरघाट माल, बोरघाट चक व पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी, देवाडा बुज, पिपरी देशपांडे, नवेगाव मोरे, दिघोरी, चक ठाणेवासना, चकठाना, भिमनी, घाटकुल, ठाणेवासना माल, चक ब्राम्हणी अशा एकूण १८ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दिघोरी शाखा ६२९० हेक्टर क्षेत्र तर गोवर्धन शाखा ७६४३ हेक्टर क्षेत्र जमीन पाण्याखाली येईल त्यामुळे सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे विशेषत्वाने लक्ष देऊन कामे पूर्ण करावी, असे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#news #breakingnews #chandrapur #rajura
#sudhirmungantiwar #urgentwatertofarmersforagriculture
#benefitofirrigation #asolamendhairrigationproject
#Farmers and farm labourers #pombhurnataluka #canal

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top