चंद्रपूर -
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील पाणीपुरवठा तसेच नविन विद्युत कनेक्शन संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, चंद्रपूर शहर महानगरपालिका व महावितरण यांनी गांभीर्याने कार्यवाही करावी व या महाविद्यालयाच्या पाणी पुरवठयाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील पाणीपुरवठा तसेच नविन विद्युत कनेक्शन संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ राखी कंचर्लवार , महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश मोहीते, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे, कार्यकारी अभियंता जामठानवाले, महापारेषणचे अधिक्षक अभियंता श्री. अवघड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. घोडमारे, एचएसएससी कंपनीचे श्री. विनोदकुमार श्री. खोत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वैद्यकिय महाविद्यालयाला पाण्याचा पुरवठा तीन माध्यमातुन होवू शकतो. बोअरवेल, मनपा, मजिप्रा द्वारे पाणी पुरवठा होवू शकतो. सध्या चार बोअरवेल परिसरात उपलब्ध आहेत. ज्यामुळे बांधकामाची प्रक्रिया व्यवस्थीत सुरू आहे. वैद्यकिय महाविद्यालयाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत ०.९ एम.एल.डी. पाण्याची गरज राहणार आहे. त्यापैकी ०.३ एमएलडी पाणी प्रक्रिया करून वापरण्यायोग्य करणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त एकंदरीत पाणी ०.६ एमएलडी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिली. बैठकीत उपस्थित महानगरपालिकेच्या अधिका-यांनी अमृत योजना कार्यान्वीत झाल्यानंतर ०.२ एमएलडी पाणी देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे ०.४ एमएलडी एवढया पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्व्हेक्षण करून महाविद्यालयाला व रूग्णालयाला पाणी पुरवठा कुठून करता येईल याची माहिती लवकरात लवकर द्यावी, असे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याआधीच वैद्यकिय महाविद्यालयाला पत्र लिहून या सर्व सर्व्हेक्षणाकरिता रू.५.००लक्ष देण्यासंबंधात विनंती केली आहे. वैद्यकिय महाविद्यालयाने याबाबत त्वरीत दखल घेण्याच्या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.
महानगरपालिकेचा पाणी पुरवठा वाढविता येईल कां यावरही मनपाच्या अधिका-यांनी विचार करावा असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. महाविद्यालयाच्या पाणी पुरवठयाची अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे कंत्राटदाराकडे असून फक्त सोर्सपर्यंत पाणी आणण्याची जबाबदारी महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. बांधकामात ९ लाख लीटरच्या दोन टाक्या या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असून कंत्राटदाराच्या सांगण्यानुसार हा एक दिवसाचा साठा राहील, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
महाविद्यालयाच्या नविन विद्युत कनेक्शन संदर्भात २२.९४ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक महावितरण कंपनीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला याआधीच दिले आहे, परंतु हे कनेक्शन दोन सोर्समधून हवे असल्याने पहिल्या टप्प्यासाठी ९.३ कोटी रू. त्वरीत मंजूर करावे, असेही बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे बे-कंस्ट्रक्शनसाठी पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख रूपये याच बरोबर देण्यात यावे असे ठरले. अधिक्षक अभियंता महापारेषण यांनी या रकमेचे अंदाजपत्रक त्वरीत महावितरण कंपनीला सादर करावे व ही दोन्ही अंदाजपत्रके शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला सादर करावे, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाने यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी शासनाला त्वरीत प्रस्ताव सादर करावा, अशा सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. हे सर्व काम पुढील सहा महिन्यात होईल असे अधिक्षक अभियंता महावितरण यांनी बैठकीत सांगीतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.