- पोलीस कार्यवाही नाही ; वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
राजुरा -
राजुरा तालुक्यातील सोंडो येथील एका महिलेला घाणेरडी मागणी करीत तिची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला या महिलेने सर्वासमोर जाब विचारल्यावर गुंड प्रवृत्तीच्या इसमाने ही महिला शेतात जात असतांना आपल्या कुटुंबासह जाऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत ही महिला बेशुद्ध झाली, तिला शेजार्यांनी रुग्णवाहिका बोलावून तातडीने चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्र, तेथून राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र गंभीर जखमी झाल्याने तिला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 4 सप्टेंबरला घडून गेल्यावर आणि त्याच दिवशी विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर सुद्धा अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे गावकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी हा दारूचा अवैध व्यावसायिक असल्याचे समजते.
सोंडो येथील सुनीता राजेंद्र मेश्राम, वय 30 या आदिवासी विवाहित महिलेची गावातील सत्यपाल उडतूलवार वय 42 या इसमाने शय्यासोबत करण्याची मागणी केली. मात्र या महिलेने त्याला नकार देत चांगलीच खरडपट्टी काढून आपल्या पतीला ही बाब सांगितली. मात्र यानंतर या इसमाने अनेकांजवळ या गरीब महिलेची बदनामी करणे सुरू केले. यामुळे संतप्त झालेल्या या महिलेने सार्वजनिक ठिकाणी सर्वासमोर या इसमाला जाब विचारला आणि पुन्हा असे न करण्याविषयी सांगितले. या गरीब आदिवासी महिलेने सर्वांसमोर आपला अपमान केला, असे समजून सत्यपालने तिचा काटा काढायचे ठरविले. दिनांक 4 सप्टेंबरला ही महिला आपल्या शेताकडे जात असतांना सत्यपाल उडतूलवार, त्याचे कुटुंबिय व नातेवाईक यांनी शेताजवळ दबा धरून या महिलेवर जोरदार हल्ला केला. या मारहाणीत ही महिला बेशुद्ध पडली. गावकऱ्यांना माहिती मिळताच तिला तातडीने विरुर जवळील चिंचोली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यानंतर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्या मणक्याला चांगलाच मार असून आज तिचे सिटी स्कॅन करण्यात आले आहे.
या घटनेची सुनीता राजेंद्र मेश्राम हिने आरोपी सत्यपाल उडतूलवार वय 45, अनिता उडतूलवार वय 35, जयपाल उडतूलवार वय ४० वर्ष, वासुदेव झिटपन्नेवार वय 55 वर्ष, गंगुबाई झिटपन्नेवार वय 50, सरिता झिटपन्नेवार वय २५ यांनी संगनमत करून बेदम मारहाण केल्याची तक्रार विरुर स्टेशन पोलीस ठाण्यात केली. मात्र अद्याप विरूर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाल्याचे गावकर्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.