Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर -  जि.प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्...
  • पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर - 
जि.प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील 408 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्रांना आता 24 तास विद्युत पुरवठा करता येणार आहे. गावातील अंगणवाडी अंतर्गत बालकांना आंनददायी शिक्षणाचे संस्कार मिळावे म्हणून जिल्हयातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सर्वसुविधा युक्त करण्याचे काम सुरु आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये विद्युत पुरवठा, पंखा, बल्ब, LED TV, बालकांची खेळणी, बाल आकार साहित्य यासह सौर ऊर्जा संचाचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हयात एकूण 2684 अंगणवाडी केंद्र असून महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत पहिल्या टप्पात 408 अंगणवाडी केंद्रांना 24 तास विद्युत पुरवठा मिळण्यासाठी सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. हे संच अंगणवाडी केंद्रांना 24 तास विद्युत पुरवठा कशाप्रकारे करेल, यापासून बालकांना कुठली इजा तर होणार नाही, यासारख्या अनेक प्रश्नांची दखल घेऊन जिल्हा परिषद, चंद्रपूर मार्फत सचित्र मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बॅटरीचा वापर, वादळी वारा 150 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाहत असल्यास सौर ऊर्जा संच पॅनलकरीता वापरण्यात येणारे मजबूत फ्रेम व त्यासाठी फ्रेमला सिंमेटने मजबूती देणे, ओव्हरलोड किंवा सदोष स्थितीमध्ये अंगणवाडी केंद्रांतील उपलब्ध इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरक्षित राखण्याकरीता एमसीबी बाॅक्स लावणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने व अपघाताची शक्यता टाळण्याकरीता सौर ऊर्जा संच मधील बॅटरी व इन्व्हर्टर एकत्रितपणे ठेवण्याकरीता विशेष लोखंडी बॉक्सची व्यवस्था करणे, पॅनल चोरीला जाऊ नये म्हणून अॅंटी थेप्ट स्क्रू चा वापर करणे, इलेक्ट्रीक अर्थिंगची सोय करणे, पॅनल ते इन्व्हर्टर पर्यंतचे सर्व वायर केसिंगने बंदिस्त करणे इत्यादी महत्वपूर्ण बाबींचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक संचाला हाताळणी करतांना काय करावे व काय करु नये, याबाबतचे सोप्या भाषेतील दिशानिर्देश पत्रक लावण्यात आले. या सर्व संचाची मोफत दुरुस्ती व व्यवस्थापनाकरीता संबंधित पुरवठा धारकांशी 5 वर्षाचा करारनामा करण्यात आलेला आहे.
पुढील काळात जिल्हयातील सर्व अंगणवाडयांना सौर ऊर्जा संच लावण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असून अंगणवाडी केंद्रांचा दर्जा व गुणवत्ता याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच चंद्रपूर जिल्हयात अंगणवाडीला लावण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा संच या कामासंबंधांने जिल्हा परिषद मार्फत तयार करण्यात आलेल्या महत्वाच्या माहितीच्या एकत्रिकरणाची राज्याचे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त इंद्रा मालो यांनी दखल घेतली असून राज्यातील इतर जिल्हा परिषदांना चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये झालेले सौर ऊर्जा संच पुरवठा व आस्थापित करण्याचे काम आदर्शवत मानून यापध्दतीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केलेल्या आहे.
"ग्रामीण भागातील बालकांसाठी अंगणवाडी ही बाल-संस्कार केंद्र असून, अंगणवाडयांना विद्युत सुविधा नसल्यामुळे बालकांना त्रास सहन करावा लागत होता. यासाठी महिला व बाल कल्याण विभागअंतर्गत सौर ऊर्जा संच लावण्याचे काम सुरु आहे. पुढील काळात जिल्हयातील सर्व अंगणवाडी केंद्रांना आवश्यक सोई-सुविधायुक्त करुन अंगणवाडी केंद्रांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांनी दिली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top