- नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित हे छापे असल्याची माहिती
बुधवारी सकाळी मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने पथकाने एकाच वेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले. वृत्त लिहिपर्यंत ही कारवाई सुरूच होती. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या छाप्यांमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपन्यांचे दस्तऐवज सीबीआयला आढळले. या बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. सीबीआयने ईडीला याबाबत माहिती दिली. ईडीनेही गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या तीन पथकांनी २५ मे रोजी अंबाझरीतील शिवाजीनगर येथील हरे कृष्ण अपार्टमेंटमधील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनी येथील समीत आयझॅक आणि गिट्टीखदानमधील जाफरनगर येथील कादरी बंधू यांच्याकडे छापे टाकले. तब्बल पाच तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिघांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेतली होती. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.