- रामपुरात गावात महावितरणच्या गलथान कारभारामुळे संतापाची तीव्र लाट
- १०० टक्के वीज वसुली पाहिजे तशीच १०० टक्के पुरवठा सुद्धा द्या
- महावितरण निवेदनाची भाषा समजत नसेल तर दुसरे मार्ग खुले
- तीव्र आंदोलन अथवा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणचे अधिकारीच दोषी
- सामाजिक संघटना तसेच सर्व पक्ष एकवटले
विजेच्या सततच्या हुलकावणीने राजुरा तालुक्यातील रामपूर गावातील नागरिकांनी वेळोवेळी तीव्र संताप केला आहे. तरीसुद्धा विजेचा सातत्याने लंपडाव सुरू आहे. कोणत्याही क्षणी वीज जाते. त्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज गेली तर, रात्र जागूनच काढावी लागत आहे, ही परिस्थिती सातत्याने उद्भवत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. शिवसेना, भाजपा, संकल्प फाउंडेशन व अन्य सामाजिक संस्थांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयाला निवेदने देऊन समस्यांच्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले. तरी देखील मुर्दाड अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी त्याची दखल हि घेतली नसल्याचे दिसून येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सततच्या विजेच्या लपंडावाने आता चक्क रामपूर ग्राम पंचायतीने सुद्धा महावितरणला निवेदन दिले असून कुंभकर्ण झोपेत असलेले अधिकारी जागे होतील का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आपल्या निवेदनात ग्रापं ने म्हटले आहे कि, गावाची लोकसंख्या १० हजाराच्या वर असून घरांची संख्या १२०० च्या वर आहे. महिन्याकाठी गावातील लोक ७० ते ८० लाखाचा भरणा न चुकता करतात. ज्याप्रमाणे महावितरण जनतेकडून १०० टक्के वीजवसुली करण्यासाठी दमदाटी करून सक्ती करते त्याच प्रमाणे १०० टक्के अखंडित वीज पुरवठा करणे हे सुद्धा त्यांचे कर्तव्य आहे. विजेच्या वारंवार लपंडावाने घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, कुलर, वॉशिंग मशीन, बोरवेल महागड्या वस्तू खराब होत असून विद्युत ग्राहकांना त्याचा आर्थिक भार हि सहन करावा लागत आहे. यापूर्वी ग्राम पंचायत कार्यालयाकडून तीन-चारदा निवेदन देण्यात आले असून महावितरणने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. आता गावातील लोक ग्रापं कार्यालयात येऊन तीव्र रोष व्यक्त करत आंदोलनाची भाषा बोलत आहे. विजेचा लपंडाव न थांबल्यास वीज बिल न भरता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू अशी भाषा सुद्धा जनतेनी केल्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास महावितरणचे अधिकारीच दोषी समजण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.
महावितरण ने वारंवार खंडित होणार वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सैल झालेले वीज तार ताठ करून स्वतंत्र वीज फिडरची सुविधा करावी अशीही मागणी केली आहे. निवेदनाची प्रतिलिपी लोकप्रतिनिधींना सुद्धा देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.