- शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुंडाचा दिवसाढवळ्या भररस्त्यात खात्मा
- एमआयडीसीत ज्येष्ठ महिलेचा गळा चिरून खून
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर -
तीन खुनांनी शुक्रवारी जिल्हा हादरला. शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुंडाचा दिवसाढवळ्या भररस्त्यात खात्मा करण्यात आला. एमआयडीसीत ज्येष्ठ महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. तर काटोलमध्ये मित्रांनी युवकाची हत्या करीत त्याचा मृतदेह जाळला. या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे.
शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी पुतळा परिसरात तिघांनी गुंडाला संपविले. मोहम्मद शाहनवाज ऊर्फ शानू असे मृत गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण घाटे, सौरभ घाटे आणि राजू उर्फ शेख या तिघांना अटक करण्यात आली. शानूवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील दोन ते तीन गुन्हे प्राणघातक हल्ल्यासंदर्भात असल्याचे सांगितले जाते. २०१९ मध्ये त्याने प्रवीण घाटे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यान प्रवीण कसातरी बचावला. तेव्हापासून घाटे बंधू आणि शानू यांच्यात वैर निर्माण झाले. घाटे बंधूंनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप करणारी खोटी तक्रार शानूने पोलिस ठाण्यात दिली होती, असे सांगितले जाते. घाटे बंधू त्याचा वचपा काढण्यासाठी योग्य संधीची वाट बघत होते. काही काळापूर्वी शानूला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे तो काही काळ वर्धा जिल्ह्यात होता, असे कळते. दोन दिवसांपूर्वी तो शहरात आला. शुक्रवारी रमजान ईद असल्याने तो घरी आला असावा, असे सांगितले जाते.
शानू नागपुरात परत आल्याची खबर सौरभ, प्रवीण आणि राजू यांना लागली. या तिघांनी त्याचा पाठलाग केला. शिवाजी पुतळा ते राम कूलर या मार्गावर त्यांनी त्याला गाठले. त्याची गाडी थांबविली आणि चाकूने सपासप वार केले. यात शानू गंभीर जखमी झाला. आरोपींनी तेथून पळ काढला. शानूने तेथून आपली गाडी वळविली आणि तो घरी परतण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने गाडीवरून काही अंतर कापताच तो कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी काही वेळातच तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या तिघांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
ज्येष्ठ महिलेचा गळा चिरला
ज्येष्ठ महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सप्तकनगर परिसरात शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. विजया शिवाळकर (वय ६४) असे या महिलेचे आहे. या महिलेचा मारेकरी अद्याप अज्ञात आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिवाळकर या राज्य राखीव पोलिस दलात स्वयंपाकी म्हणून कार्यरत होत्या. २०१७ मध्ये त्या निवृत्त झाल्या. तेव्हापासून त्या सप्तकनगरात राहतात. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांचा मुलगा राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. सप्तकनगरातील घरात त्या एकट्याच राहात असत. बिसेन नावाची एक महिला त्यांच्याकडे घरकामासाठी येत असे. ती दुपारी कामाला आली. तिला दार उघडे दिसले. ती घरात शिरताच पहिल्याच खोलीत विजया रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. महिलेने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. एमआयडीसी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्या कुणी केली, याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. घरातील परिस्थितीवरून ही हत्या लुटपाटीच्या उद्देशाने हत्या झाली नसावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पोलिस सर्वच बाजूंनी तपास करीत आहेत. तूर्तास पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीसुद्धा तात्या टोपेनगर परिसरातील रहिवासी जयश्री बाळ यांचीही अशीच हत्या झाली होती. त्या हत्येचा उगडला अद्यापपर्यंत झालेला नाही, हे विशेष.
दारूच्या वादातून तरुणाला संपविले
दारू प्यायल्यावर वाद विकोपाला गेला आणि यातून तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आला. काटोल येथे ही घटना घडली. अंगद ऊर्फ बिट्टू अशोकराव कडूकर (वय २८, रा. रिधोरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय रामदा घिचेरिया (वय ३१) आणि मंगेश एकनाथराव जिचकार (वय ३२, रा. दोघेही धवड लेआउट, काटोल) यांना अटक करण्यात आली. गुरुवारी अंगद हा आपल्या एमएच-०४, एडब्ल्यू-५१२३ क्रमांकाच्या कारने काटोल येथे गेला होता. त्याठिकाणी बंड रुग्णालयाजवळ झुणका-भाकर केंद्राजवळ आरोपी बसले होते. त्याठिकाणी ते दारू पिण्याच्या वाद झाला. या वादातून दोघांनी मिळून चाकूने अंगदचा खून केला. त्यानंतर पेट्रोलने मृतदेह जाळला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.