- सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू
- औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी
- 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू
- मास्क न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड
रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापी तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरू, पुजारी यांना करता येतील. वय वर्षे 65 वरील व्यक्ती, दुर्धर आजार असणारे नागरिक अर्थात पर्सन विथ कोमोरबिडिटीस, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. बाह्य शारिरीक क्रियाकलाप (आऊटडोअर फिजिकल अॅक्टिव्हिटी) करण्यास कोणतेही बंधन असणार नाही.
सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढील प्रमाणे परवानगी राहील. यामध्ये टॅक्सी,कॅब,अॅग्रीगेटर फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, रिक्षा फक्त अत्यावश्यक 1 अधिक 2 प्रवासी, चारचाकी फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, दोन चाकी 1 अधिक 1 प्रवासी मास्क व हेल्मेट्सह तसेच प्रवास करतांना कायम मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.
सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेमध्ये चालू राहतील. तथापि मेडिकल, औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास सदर दुकाने तात्काळ बंद करावीत.
जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत त्यामध्ये पाच व्यक्तींची बँड पथक, सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करणे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देण्यात येत आहे. (घरपोच वितरणासह) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच या कार्यालयाकडील यापूर्वी दिलेल्या अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सेतु केंद्र, महा-ई सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे.
ऑक्सीजन उत्पादन व वाहतूक करणार्या वाहनांच्या हालचालीस राज्यात आणि राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. याबाबत सक्षम प्राधिकारी हे वहन करणाऱ्या वाहनांच्या विनाअडथळा वाहतुकीची दक्षता घेतील तसेच ऑक्सिजनच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध असणार नाही.
दिनांक 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट त्यांच्याकडील ग्राहकांच्या बैठक व्यवस्थेचा 50 टक्के इतके क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी राहील. तथापि त्याकरिता पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील.अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.
दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी. तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु.500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 2 हजार दंड आकारण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाचे काटेकोर पणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत करण्यात येईल.
जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाच्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे.औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टीचे वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविण्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. सदरचा आदेश दि.1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीकरिता संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्याचे हद्दीत लागु राहील.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.