- शेतमाल जीवनावश्यक वस्तू कायद्यातून मुक्त
- हा शेतकरी संघटनेच्या अर्थवादी विचारांचा विजय - एड. वामनराव चटप
सन १९५५ च्या जीवनावश्यक वस्तू कायद्याचा आधार घेऊन शासनाने अन्नधान्य, तेलबिया, डाळी, कांदा, बटाटा व खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत वेळोवेळी नोटिफिकेशन काढून समाविष्ट केले होते. ही बाब शेतकऱ्यांच्या बाजारपेठेच्या स्वातंत्र्याच्या सतत आड येत असल्यामुळे उत्पादनापासून ते साठ्यापर्यंत आणि देशांतर्गत व देशाबाहेरच्या बाजारपेठेत शेतमाल नेतांना विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या "आमचा माल, मालक आम्ही,वाटेल तिथे, विकु आम्ही" या स्वातंत्र्य घोषणेच्या आड येत होत्या.
म्हणून युगात्मा शरद जोशी यांनी १९८० पासून सर्व शेतमाल जीवनावश्यक कायद्याच्या कचाट्यातून मोकळा करावा, म्हणून ३५ वर्ष शेवटच्या श्वासापर्यंत या मागणीसाठी संघर्ष केला व त्यांचे निधनानंतर शेतकरी संघटनेने या मागणीसाठी सातत्याने अविरतपणे हा लढा सुरू ठेवला. शेवटी कोरोना या जागतिक संकटामुळे व महामारी मुळे जगाची व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे परिस्थितीनीच सरकारची इच्छा नसतानाही उशिरा का होईना पण रायगडाला जाग आली आणि परिस्थितीनीच जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करून सर्व शेतमाल जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याच्या कचाट्यातून मोकळे करणे भाग पडले. हे शेतकरी संघटनेचे चाळीस वर्ष शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याकरिता अविरतपणे चालविलेल्या संघर्षाचे यश आहे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, उन्नतीचा अर्थवादी विचार मांडल्याबद्दल युगात्मा शरद जोशी यांचे स्मरण करीत या निर्णयाबद्दल शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, प्रांताध्यक्ष अनिल घनवट, शैलाताई देशपांडे, राम नेवले, सतीश दाणी, गुणवंत हंगरगेकर, ललित बहाळे, मदन कामडे, मधुकर हरणे, सुधीर बिंदू, सौ.गीता खांडेभराड, कैलाश तंवार, सीमाताई नरोडे, संजय कोले, कडूअप्पा पाटील, विजय निवल, जगदीशनाना बोन्डे, वामनराव जाधव, प्रभाकर दिवे, प्राचार्य अनिल ठाकुरवार, एड. शरद कारेकर, प्रा.रामभाऊ पारखी, राजेंद्रसिह ठाकूर, शालीक नाकडे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.