- ४ हजारांवर रुग्णसंख्येसह गाठला नवा उच्चांक
- गेल्या २४ तासांत ४ हजार ९५ नवीन रुग्णांची भर
- करोनाची साथ आल्यापासूनची उच्चांकी रुग्णवाढ
- नागपूर शहरातील स्थिती होत आहे अधिकच गंभीर
नागपुरात करोना साथीने शिरकाव केल्यानंतर आजवरचा उच्चांक आज नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात आज एका दिवसात तब्बल ४ हजार ९५ नवीन करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी आज १ हजार ९४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ३५ रुग्ण करोनाने दगावले आहेत. नागपूर शहरातील स्थिती अधिक गंभीर आहे. नागपूर शहरातही दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला असून आज २ हजार ९६६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर शहरात करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले टाकत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्याअनुषंगाने अनेक निर्बंध आणण्यात आले आहेत. त्याचवेळी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन झटून काम करत आहे. गेल्या काही दिवसांत करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. असे असताना करोनाचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने भीती वाढू लागली आहे.
दरम्यान, करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने नागपुरात होळी, धूलिवंदन आणि शब-ए-बारात हे सण-उत्सव खासगी वा सार्वजनिक स्वरूपात एकत्र येऊन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात मिरवणूक काढण्यासही मनाई राहणार आहे. २९ मार्च रोजी (धूलिवंदन) बाजारपेठ, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील तसेच भाजीपाला, मटण, चिकन शॉपसाठी दुपारी १ वाजेपर्यंतच परवानगी असेल, असे पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.