Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जांभुळघाट आश्रमशाळेतील टक्कल प्रकरण; आता कारवाईकडे पालकांचे लक्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अधीक्षकांचा पदभार हटविला, मात्र पालकांची नियमानुसार कारवाईची मागणी कायम आमचा विदर्भ - वृत्तसेवा  चिमूर / चंद्रपूर (दि. ६ ऑक्टोबर २०२६) -    ...
अधीक्षकांचा पदभार हटविला, मात्र पालकांची नियमानुसार कारवाईची मागणी कायम
आमचा विदर्भ - वृत्तसेवा 
चिमूर / चंद्रपूर (दि. ६ ऑक्टोबर २०२६) -
         चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्धवट व पूर्ण टक्कल करण्यात आल्याच्या प्रकाराला आता गंभीर वळण मिळाले आहे. पालकांच्या तीव्र विरोधानंतर आश्रम शाळेचे अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्याकडील अधीक्षक पदाचा पदभार काढून तो शिक्षकाकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, चिमूर आदिवासी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी जांभुळघाट आश्रम शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची चौकशी केली. या चौकशीचा अहवाल पुढील कारवाईसाठी आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंग यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

        चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत जांभुळघाट येथे निवासी आदिवासी आश्रम शाळा असून येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. आदिवासी विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या केस कर्तनाची व्यवस्था केली जाते. यापूर्वी विद्यार्थ्यांचे नेहमी साध्या पद्धतीने केस कापले जात होते. मात्र यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे अर्धवट तसेच पूर्ण टक्कल करण्यात आल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.

        मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे ४ वाजता विद्यार्थ्यांचे केस कापण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी एका सलूनवाल्याला बोलावण्यात आले होते. संबंधित शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार सुमारे ८२ विद्यार्थ्यांचे अर्धवट टक्कल करण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे पूर्ण टक्कल करण्यात आले, तर आणखी काही विद्यार्थ्यांचे वेगळ्या पद्धतीने केस कापण्यात आल्याचे सांगण्यात येते.

        विद्यार्थ्यांचे केस कापण्याची पद्धत अचानक का बदलण्यात आली, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे टक्कल करण्याचे निर्देश नेमके कोणी दिले आणि या प्रकारामागील कारण काय, असे प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे केस कापण्यात आले नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

        घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी मोठ्या संख्येने पालकांनी आश्रम शाळेत धाव घेतली. अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांच्याकडे पुन्हा अधीक्षक पदाची जबाबदारी देऊ नये, अशी मागणी पालकांनी केली. पालकांनी ही मागणी प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्यासमोरही मांडली.

        यानंतर प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी शाळेला भेट देऊन संबंधितांकडून घटनेची माहिती घेतली. अधीक्षकांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी किंवा मुख्याध्यापकांकडे नसल्याचे पालकांना सांगण्यात आले. त्यामुळे घटनेचा अहवाल व पुढील कारवाईचा प्रस्ताव आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंग यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

        दरम्यान, अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्याकडील पदभार तत्काळ काढून तो शिक्षकाकडे सोपविण्यात आल्याने पालकांचा रोष काही प्रमाणात कमी झाला असला तरी, मात्र केवळ पदभार काढून न थांबता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

#जांभुळघाट #चिमूर #चंद्रपूर #आश्रमशाळा #जांभुळघाटआश्रमशाळा #आदिवासीआश्रमशाळा #विद्यार्थी #विद्यार्थ्यांचेटक्कल #पालकांचाआक्रोश #चिमूरबातम्या #चंद्रपूरबातम्या #आदिवासीविभाग #जागृतीकुमरे #प्रशांतआत्राम #आरुषीसिंग #MaharashtraNews #ChandrapurNews #ChimurNews #AamchaVidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top