आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. २३ सप्टेंबर २०२६) -
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील ३४ वर्षीय युवा शेतकरी राहुल उर्फ नत्थू मारोती तेलसे यांचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलोपार्जित शेतीत नियमितपणे कष्ट करणारे राहुल तेलसे कापूस पिकाला खत देत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. छातीत वेदना सुरू झाल्यानंतर राहुल शेतातून गावाकडे पायी निघाले. मात्र वाटेत त्रास वाढल्याने मित्रांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, विरूर येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे रेफर करण्यात आले. मात्र राजुरा येथे नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
राहुल तेलसे हे शेतीत नियमितपणे काम करीत होते. शेतीच्या कामादरम्यान कीटकनाशकांची फवारणी तसेच खतांचा वापर केला जात असल्याने खत देताना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची तबेत बिघडली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र नेमका मृत्यू कशाने झाला हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की खत अथवा कीटकनाशकाच्या संपर्कामुळे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
राहुल तेलसे यांच्या पश्चात सात वर्षांची मुलगी, चार वर्षांचा मुलगा आणि कुटुंबीय असा परिवार आहे. दोन लहान मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने तेलसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने विरूर स्टेशन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
#WirurStation #WirurNews #RajuraNews #ChandrapurNews #FarmerDeath #FarmerNews #CottonFarmer #CottonCrop #YoungFarmer #VidarbhaFarmer #MaharashtraFarmer #AgricultureNews #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.