आमचा विदर्भ - वृत्तसेवा
चंद्रपूर (दि. १६ सप्टेंबर २०२६) -
वेकोलीच्या वणी, बल्लारपूर, चंद्रपूर आणि माजरी क्षेत्रातील कोळसा खाणींमध्ये विविध कंत्राटदार तसेच आउटसोर्सिंग कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या कामगारांची नियमानुसार पोलीस व कामगार पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर-गडचिरोली असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष जैरूद्दीन शेख (छोटुभाई) यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत केंद्रीय कोळसा मंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे. कोळसा खाणी हे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असल्याने येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी व बाहेरराज्यातील कामगारांची ओळख आणि पार्श्वभूमी अधिकृत नोंदींच्या आधारे तपासणे आवश्यक असल्याचे शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोळसा खाणींच्या सुरक्षेचा मुद्दा
जैरूद्दीन शेख यांनी सांगितले की, कोळसा खाणींमध्ये ब्लास्टिंग, स्फोटक पदार्थांची हाताळणी, अवजड यंत्रसामग्री तसेच विविध संवेदनशील सुरक्षा क्षेत्रांमध्ये कामगारांचा प्रत्यक्ष वावर असतो. त्यामुळे अशा ठिकाणी कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याची ओळख, कायमचा पत्ता, सध्याचा पत्ता आणि रोजगाराशी संबंधित आवश्यक नोंदी अद्ययावत असणे गरजेचे आहे.
वणी, बल्लारपूर, चंद्रपूर आणि माजरी क्षेत्रातील कंत्राटदार व आउटसोर्सिंग कंपन्यांकडे कार्यरत असलेल्या कामगारांची अद्ययावत यादी प्रशासनाने उपलब्ध करून घ्यावी. त्यामध्ये कामगाराचे नाव, ओळख, पत्ता आणि रोजगाराशी संबंधित आवश्यक माहितीची नियमानुसार पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ब्लास्टिंग व ऑपरेटर कर्मचाऱ्यांची विशेष तपासणी
विशेषतः ब्लास्टिंग, स्फोटके हाताळणी आणि अवजड यंत्रसामग्री चालविणाऱ्या ऑपरेटर पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि पात्रतेशी संबंधित तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. कंत्राटदारांकडे आवश्यक नोंदणी व परवाने आहेत का, कामगारांची नियमानुसार नोंद ठेवली जाते का आणि सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त सुरक्षा ऑडिटची मागणी
वेकोलीच्या संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत कंत्राटदार व आउटसोर्सिंग कंपन्यांच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी जिल्हा पोलीस, जिल्हा प्रशासन, खाण प्रशासन आणि कामगार विभागाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून कामगारांची अधिकृत नोंदणी, ओळखपत्रे, पत्ते, आवश्यक परवाने, पोलीस पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास कायदेशीर कारवाईची मागणी
एखाद्या कामगाराची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी अधिकृत पोलीस किंवा न्यायालयीन नोंदींमधून आढळून आल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जैरूद्दीन शेख यांनी केली आहे. तसेच नियमांनुसार रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
परप्रांतीय कामगारांवर भेदभाव नको
दरम्यान, केवळ एखादा कामगार बाहेरच्या राज्यातील आहे म्हणून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अन्याय होऊ नये, अशी स्पष्ट भूमिकाही निवेदनात मांडण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करताना केवळ अधिकृत पोलीस व न्यायालयीन नोंदी, लागू असलेले कायदे आणि नियम यांच्या आधारेच निर्णय घेण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
वेकोली प्रशासन व संबंधित यंत्रणांनी कंत्राटी कामगारांच्या नोंदी आणि सुरक्षा प्रक्रियेची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच खाणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चंद्रपूर-गडचिरोली असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष जैरूद्दीन शेख यांनी केली आहे.
#WCL #WCLNews #WCLChandrapur #ChandrapurNews #Chandrapur #Wani #Ballarpur #Majri #CoalMine #CoalMining #ContractWorkers #PoliceVerification #WorkerVerification #MiningSafety #SafetyAudit #ChandrapurNewsToday #MaharashtraNews #VidarbhaNews #AamchaVidarbha #LocalNews

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.