नवी दिल्लीतील फेडरेशन फॉर न्यू स्टेट्सच्या बैठकीत विदर्भ राज्याच्या प्रश्नाला गती
आमचा विदर्भ वृत्त सेवा
नवी दिल्ली (दि. ०४ जून २०२६) -
देशभरातील २२ स्वतंत्र नव्या राज्यांच्या निर्मितीची मागणी करणाऱ्या फेडरेशन फॉर न्यू स्टेट्स (एफएनएस – नवराज्य निर्माण महासंघ) यांच्या कार्यकारिणीची बैठक २८ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे अध्यक्ष बाबा तोमर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २२ प्रस्तावित राज्यांपैकी पहिल्या टप्प्यात चार राज्यांच्या निर्मितीचा प्रश्न केंद्र सरकारसमोर प्राधान्याने मांडण्याचा आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. या चार राज्यांमध्ये विदर्भ (महाराष्ट्र), बुंदेलखंड (उत्तर प्रदेश), हरित प्रदेश अर्थात पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व आंध्र प्रदेश (आंध्र प्रदेश) यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिली.
बैठकीत डिसेंबर २०२७ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी संघटित आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विदर्भ राज्याच्या मागणीसाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जनजागृती व संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला. बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, युवा प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, तात्यासाहेब मते, कोअर कमिटी सदस्य डॉ. पद्मा राजपूत यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
नवराज्य निर्माण महासंघाचे अध्यक्ष आर. के. तोमर (नवी दिल्ली), नेते रश्मी बालियान, ब्रिजपालसिंग तलन, उपाध्यक्ष मेट्टा रामाराव (पूर्व आंध्र प्रदेश), सचिव कमलेश कुमार झा (मिथिला, बिहार), ॲड. वामनराव चटप (विदर्भ), कर्नल सुधीर चौधरी (हरित प्रदेश), माजी खासदार सनसुमा खुंग्गुर (बोडोलँड, आसाम), डॉ. फकरीन (गोरखालँड, पश्चिम बंगाल), प्रवीण पांडे (बुंदेलखंड), डॉ. पंकज पटेल (आदिवासी प्रदेश, गुजरात), विजय चौधरी, शिवेंद्र तोमर, माधवी रामाराव, राजू राजपाल, आदील गांधी, तश्वर अली, फैय्याज पटेल, डी. लोकेश्वरराव तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे इतर पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत नव्या राज्यांच्या निर्मितीसाठीचा लढा अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि फेडरेशन फॉर न्यू स्टेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने २२ राज्यांतील प्रतिनिधी आणि एफएनएसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'संयुक्त विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा' नोव्हेंबर–डिसेंबर २०२६ दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यात विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बातमीतील महत्त्वाचे मुद्दे
- नवी दिल्ली येथे फेडरेशन फॉर न्यू स्टेट्सच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.
- २२ प्रस्तावित राज्यांपैकी विदर्भासह चार राज्यांच्या निर्मितीला पहिल्या टप्प्यात प्राधान्य.
- डिसेंबर २०२७ पर्यंत विदर्भ राज्यासाठी संघटित आंदोलन उभारण्याचा निर्धार.
- माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
- देशातील विविध राज्यांतील पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठकीस उपस्थिती.
- नोव्हेंबर–डिसेंबर २०२६ मध्ये नागपूर येथे संयुक्त विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्याचा निर्णय.
- विदर्भ राज्याच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ देण्याचा संकल्प.
#Vidarbha #VidarbhaState #VidarbhaRajya #Nagpur #Rajura #Maharashtra #NewStates #FederationForNewStates #VidarbhaMovement #WamanraoChatap #Chandrapur #MaharashtraNews #BreakingNews #PoliticalNews #VidarbhaNews #aamchavidarbha #vidarbha #विदर्भ #विदर्भराज्य #विदर्भराज्यआंदोलन #नागपूर #राजुरा #चंद्रपूर #महाराष्ट्र #नवराज्यनिर्माण #राजकीयबातम्या #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #विदर्भन्यूज

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.