मानसिक तणावामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबाचा आरोप
घटनेनंतर शहरात खळबळ; निष्पक्ष चौकशीची मागणी
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
चंद्रपूर (दि. १८ जुलै २०२६) -
चंद्रपूर शहरात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाच्या चौकशीशी संबंधित एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून चंद्रपूर शहरातील रय्यतवारी कॉलरी येथील रहिवासी दिलीप यादव (वय ४६) यांनी शहर पोलीस ठाण्यात विषप्राशन केल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भिवापूर परिसरातील एका गांजा तस्कराला अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिलीप यादव यांना पोलिसांकडून वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
मृतकाचा मुलगा कृष्णा यादव याने गंभीर आरोप करत सांगितले की, पोलीस वारंवार घरी येऊन वडिलांवर दबाव टाकत होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. शुक्रवारी दुपारी सुमारे १.३० वाजता काही पोलीस कर्मचारी घरी आले आणि त्यांना शहर पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर दिलीप यादव यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विषप्राशन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
घटनेपूर्वी दिलीप यादव यांनी ३९ सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून पैशांसाठी फोन येत असल्याचा आरोप केला आहे. "मी काहीच केले नाही, तर पैसे का द्यायचे?" असा सवाल करत आपण उचलत असलेल्या टोकाच्या पावलासाठी शहर पोलीस ठाणे जबाबदार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या आरोपांवर पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात येण्यापूर्वीच बाहेर विषप्राशन केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती वाहन पार्क करून पोलीस ठाण्यात येताना दिसत आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी पुढे सांगितले की, मृत व्यक्ती रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांचीही सखोल चौकशी करण्यात येणार असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तपासणी केली जाईल.
या घटनेनंतर शहरात विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली असून मृत्यूमागील नेमके कारण, मृत व्यक्तीने केलेले आरोप आणि पोलिसांची भूमिका याबाबत अधिकृत चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही दाव्याला अंतिम सत्य मानता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
#ChandrapurNews #CrimeNews #PoliceInvestigation #BreakingNews #MaharashtraNews #VidarbhaNews #Justice #ViralVideo #LatestNews #LawAndOrder #PoliceInquiry #CrimeUpdate #NewsUpdate #ChandrapurPolice #aamchavidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.